राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलंबित नेते सूरज चव्हाण यांच्याकडून झालेल्या मारहाण प्रकरणी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करून ती मान्य न झाल्यास पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
लातूरमध्ये घडलेला प्रकार चुकीचा असल्याचे अजित पवार यांनी या वेळी मान्य केल्याचे घाडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मारहाण करणार्यांना किरकोळ गुन्हा दाखल करून सोडून दिल्याचे निदर्शनास आणून देताच पवार स्वतः लातूर पोलिसांशी बोलले व आरोपींवर कडक कारवाई करा, असे आदेशही दिले, असेही त्यांनी सांगितले.
कोकाटे प्रकरणी पवारांनी दोन दिवसाची मुदत मागितली असून मंगळवारी याबाबतचा निर्णय घेऊ, असे आश्वासन पवार यांनी दिले आहे. तसेच सूरज चव्हाण यालाही पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे घाडगे यांनी सांगितले. मंगळवारपर्यंत कोकाटेंच्या बाबत योग्य निर्णय न झाल्यास राज्यभर जोरदार आंदोलन करण्याचा इशाराही घाडगे यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना दिला.
