देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच उघडपणे म्हणाले…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही बडे नेते एकाच सरकारमधील मंत्री असले तरी दोन्ही नेत्यांमध्ये अंतर्गत शीतयुद्ध सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच सुरु असते.
एकनाथ शिंदे यांनी नाराजीतून मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारल्याची चर्चेपासून ते शिंदेंनी दिल्लीला जावून भाजपश्रेष्ठींकडे फडणवीसांची तक्रार केल्याची चर्चा असेल, प्रत्येक वेळी दोघांमधील कथित अघोषित संघर्षाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असते. यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये खरंच शीतयुद्ध सुरु आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होतो. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत कसं नातं सुरुय?
एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमचं नेहमीच चांगलं नातं राहिलेलं आहे. यापुढेही चांगलेच राहतील. आमच्या एवढ्या कॅबिनेट बैठका झाल्या. दर मंगळवारी आमच्या कॅबिनेट बैठका होतात. या सर्व बैठकांमध्ये केवळ एका बैठकीत एकनाथ शिंदे आले नाहीत. त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. त्यांनी मला फोन केला की, मी ठाण्यात आहे. इथे खूप पाऊस पडलाय. तर मी इथे जी व्यवस्था आहे ते पाहू इच्छित आहे. त्यामुळे मी येणार नाही. त्यामुळे ते नाही आले. आमच्यात सर्व ठिकठाक आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
मी आधी मुख्यमंत्री होतो आणि माझ्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. त्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात मी उपमुख्यमंत्री बनलो. यानंतर मी पुन्हा मुख्यमंत्री बनलो आणि माझ्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री बनले. त्यांनी माझ्या नेतृ्त्वात काम केलं आहे आणि मी देखील त्यांच्या नेतृत्वात काम केलं आहे. त्यामुळे ही खूप मोठी डील आहे असं वाटत नाही. मी तर पाच वर्ष लगातार मुख्यमंत्री राहिलो. त्यानंतर मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत राहिलो. मी त्या काळात मुख्यमंत्र्यांचा कोणताही प्रोटोकॉल मोडला नाही. तसेच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी मला जो आदर द्यायला हवा तो त्यांनी नेहमीच दिला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
फाईल वॉर सुरु आहे का?
“पहिली गोष्ट म्हणजे कोणताही फाईल वॉर सरु नाही. मला असं वाटतं की, कोणत्या फाईलमध्ये कायदेशीररित्या काही गोष्टी करायला हव्यात तर मी मंत्र्यांना बोलवतो. त्यांना मी काय करायला हवं ते सांगतो. फाईल आल्या आणि थांबल्या असं कधी होत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
