अमित शाहांचं रोखठोक उत्तर; नेमकं काय म्हणाले…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्या रोखठोक भूमिकेमुळे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी महाआघाडीची मोट बांधली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी नुकतीच इंडिया टुडेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांवर शाह यांनी आपल्या खास शैलीत उत्तरे दिली आहे. इतकेच नाही तर भाजपा मुस्लीम उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट का देत नाही याबाबतही त्यांनी खुलासा केला. नेमके काय म्हणाले अमित शाह? जाणून घेऊ…
‘बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार येणार’
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाष्य केले. राज्यातील जनतेचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा पाठिंबा आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीवर अनेकजण समाधानी आहेत, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही एनडीएला बहुमत मिळणार आणि १६० हून अधिक जागांवर आमचा विजय होणार, असा दावा अमित शाह यांनी केला. भारतीय जनता पक्षासह एनडीएमधील मित्रपक्षांचा विजयी स्ट्राइक रेट एकसमान असेल असेही ते म्हणाले.
‘देशात फक्त भाजपाचीच विचारधारा’
१९८० मध्ये भाजपाचा पुर्नजन्म झाला आणि २०२५ पर्यंत ४५ वर्षांच्या कालखंडात देशात १७ वर्ष भाजपाचे सरकार राहिले. आज जवळजवळ देशातील एक तृतीयांश राज्यात भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सरकारे आहेत. तसेच हजारो, शेकडो स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या ताब्यात आहेत; यावरून आमच्या पक्षाची विचारधारा अनेकांनी स्वीकारली असल्याचे दिसून येते. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवले आहे, अशी आठवणही शाह यांनी करून दिली.
बिहारमधील विकासकामांचा वाचला पाढा
अमित शाह यांनी यावेळी बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढाही वाचून दाखवला. “राज्यात पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन झाल्यास रोजगारांच्या संधी निर्माण केल्या जातील. तसेच सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण निश्चित केले जाईल. आतापर्यंत ११ वर्षांत एनडीए सरकारने राज्यात अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम केले आहे. उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पंतप्रधान मोदींनी आधीच विकसित केल्या आहेत. बिहारमध्ये अनेक लहान आणि मोठे उद्योग आहेत”, असे शाह म्हणाले.
तेजस्वी यादव यांच्यासह राजदला केलं लक्ष्य
तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल पक्षाला निवडणुकीत यश मिळाले तर बिहारमध्ये जंगलराज येईल, अशी टीकाही अमित शाह यांनी केली. ते म्हणाले, “तेजस्वी यादव जरी राजदचे अध्यक्ष असले तरी पक्षाची सर्व सूत्रे अजूनही लालू प्रसाद यादव यांच्याच हातात आहेत. जर राज्यात त्यांचे सरकार आले तर नवीन चेहऱ्यांसह जंगलराज येईल, त्यामुळे माझे बिहारच्या जनतेला आवाहन आहे की त्यांनीही या गोष्टीचे भान ठेवावे. राज्याच्या विकासासाठी कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहणे गरजेचे आहे. विकासकामे करण्याची हिंमत फक्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्येच आहे. विरोधकांची महाआघाडी (राजद-काँग्रेसचा समावेश) कोणतीच कामे करणार नाही.
