100% तंत्रज्ञान हस्तांतरणाची तयारी…
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन( vladimir putin) पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या भेटीआधीच मॉस्कोकडून दिलेला एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव भारत-रशिया ( India-Russia) संरक्षणसहकार्याला नवी दिशा देणारा ठरू शकतो. अनेक दशकांच्या सामरिक नात्याची पुनर्स्थापना करत, रशियाने भारताला त्यांचे अत्याधुनिक एसयू-५७ (Su-57) पाचव्या पिढीचे स्टेल्थ फायटर जेट देऊ केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रशिया या जेटचे १००% तंत्रज्ञान हस्तांतरण आणि भारतातच परवानाधारक उत्पादन सुरू करण्यास पूर्णपणे तयार आहे.
भारताला दिलेली सर्वात मोठी ‘टेक्नॉलॉजी ऑफर’
दुबई एअर शोदरम्यान रशियाच्या सरकारी मालकीच्या रोसोबोरोनेक्सपोर्ट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने अधिकृतपणे घोषणा केली की,
“आम्ही भारताला Su-57 पुरवण्यास आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासह भारतात उत्पादन क्षमता उभारण्यास पूर्णतः तयार आहोत.”
या पॅकेजमध्ये समाविष्ट असणार,
पाचव्या पिढीतील स्टेल्थ तंत्रज्ञान
अत्याधुनिक इंजिन प्रणाली
फायटर जेटच्या अन्य महत्त्वपूर्ण प्रणालींवरील संपूर्ण तांत्रिक प्रशिक्षण
कोणतेही निर्बंध किंवा अटी नसलेले टेक ट्रान्सफर
ही घोषणा अशा काळात करण्यात आली आहे जेव्हा भारतीय हवाई दल पुढील पिढीतील फायटर जेट्सचा पर्याय शोधत आहे. पश्चिमी देशांनी (अमेरिका, युरोप) भारताला फायटर जेटच्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचे हस्तांतरण देण्यास फारशी तयारी दाखवलेली नाही. अशावेळी रशियाची १००% टेक्नॉलॉजी ऑफर भारतासाठी एक मोठी संधी मानली जात आहे.
भारत-रशिया संरक्षणसंबंधांचा ऐतिहासिक प्रवास
भारत आणि रशिया (पूर्वीचे USSR) यांचे संरक्षण क्षेत्रातील नाते जवळपास ६ दशकांहून अधिक जुने आहे. 1960 च्या दशकात MiG-21 चे भारतातील उत्पादन हा या मैत्रीचा पाया ठरला.
नंतरचे काळात,
MiG-23
MiG-27
Su-30MKI
ब्रह्मोस यांसारखे अनेक महत्वाचे प्रकल्प या सहकार्याचा भाग झाले.
आजही भारतीय हवाई दलाच्या फ्लीटमध्ये Su-30MKI हे मुख्य आणि सर्वात विश्वासार्ह लढाऊ विमान आहे.
भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेला पाठबळ
वियन च्या अहवालानुसार, रशियाने नमूद केले आहे की,
“आम्ही काही मोजक्या देशांपैकी एक आहोत जे भारताला तंत्रज्ञान रोखून ठेवत नाहीत. उलट, आम्ही भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेला अधिक दृढ करण्याचा मार्ग तयार करतो.”
पश्चिमी देशांकडून येणाऱ्या मर्यादित तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या अटींमुळे भारताला आपल्या संरक्षण प्रकल्पांमध्ये स्वायत्तता साधणे कठीण होते. याच्या उलट, रशियाचा दावा आहे की, कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसलेले तंत्रज्ञान हस्तांतरण हे त्यांचे भारताशी असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.
Su-57 भारतासाठी का महत्त्वाचा?
Su-57 हा जगातील अत्यंत प्रगत पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर जेट्सपैकी एक आहे. त्याची वैशिष्ट्ये,
रडारला जवळपास अदृश्य
अतिवेगवान सुपरक्रूझ क्षमता
प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली
उच्च पेलोड क्षमता
अत्याधुनिक AI-आधारित फायर कंट्रोल
भारतीय हवाई दलासाठी भविष्यातील युद्धतंत्रात असे स्टेल्थ फायटर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
पुतिन यांच्या भेटीपूर्वी वाढली हलचल
रशियन राष्ट्राध्यक्ष येण्याआधीच संरक्षणक्षेत्रात दोन्ही देशांमधील चर्चेला वेग आला आहे. कयास बांधले जात आहेत की, पुतिन यांच्या भेटीदरम्यान Su-57 कराराविषयी महत्त्वाची प्रगती होऊ शकते. भारतीय हवाई दलाच्या भविष्यातील ताफ्यात ‘पाचव्या पिढीचे जेट’ समाविष्ट करण्याचा निर्णय या भेटीनंतर अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
