प्रतिनिधी सोमनाथ काळे
जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील घोगांव येथील हिंदूरत्न ह.भ.प. श्री. शांताराम महाराज साळुंखे यांना ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र साई जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार २०२६ राष्ट्रीय पातळीवरील आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साईंच्या पवित्र भूमी शिर्डी येथे सिटी मार्केट शेजारील परिवार लॉन्स बँकेट हॉलमध्ये आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. समाजप्रबोधन, परिवर्तनवादी चळवळ, वारकरी परंपरेचा प्रसार तसेच आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव, प्रेरणादायी व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संगमनेरचे उद्योजक मा. किशोर शेठ कालडा होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. धर्मवीर सहाणे, लावणी सम्राज्ञी आकांक्षा कुंभार, सिनेअभिनेता अमित पाटील, योगेश पवार तसेच प्राचार्य अरुण गायकवाड उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महाराजांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, साई आशीर्वाद स्वरूप शाल व मानाचा कोल्हापुरी फेटा देऊन गौरविण्यात आले. ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक कार्य, पत्रकारिता, वैद्यकीय, संरक्षण व चित्रपट क्षेत्रातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. एकूण ३२ विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गायिका डॉ. विद्या पाटील यांच्या साईबाबा व गणपती आरतीने झाली. महिला लेझीम पथक व वाद्यवृंद कलाकारांनी सादर केलेल्या कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रस्तावना व स्वागत सुदाम संसारे यांनी केले. सूत्रसंचालन कु. आश्विनी पुरी, सौ. प्रियंका भरते व कु. आश्विनी सांगळे यांनी केले.
ह.भ.प. शांताराम महाराज साळुंखे यांना यापूर्वी राष्ट्रसेवा पुरस्कार २०२३, प्राइड ऑफ स्पंदन २०२३, हिंदू रत्न २०२४ असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या राष्ट्रीय सन्मानाबद्दल सांगली जिल्ह्यासह वारकरी संप्रदायातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
