दै. चालु वार्ता, पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): पैठण नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा विद्या भूषण कावसनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पहिल्याच सभेत नाथषष्ठी निमित्ताने येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आ. भुमरे यांच्या मार्गदर्शनानुसार नाथषष्ठीसाठी येणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांकडून जागा भाडे सरसकट फक्त एक हजार रुपये आकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यापूर्वी व्यापाऱ्यांकडून जागेच्या आकारानुसार एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले जात होते. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विद्या कावसनकर यांनी भाड्यात मोठी सवलत देत हा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे दिव्यांगांना नगरपरिषद निधीतून दिले जाणारे पंधराशे रुपयांचे मानधन वाढवून दोन हजार रुपये करण्याचाही ठराव या सभेत मंजूर करण्यात आला. या निर्णयाला उपस्थित सर्व 25 नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दर्शवला. सभेस उपनगराध्यक्ष तुषार पाटील, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, नगरसेवक रफिक कादरी, ईश्वर दगडे, सुनील रासने, बजरंग लिंबोरे, विलास आडसुल, गौरव आठवले, महेश मुंदडा, ज्ञानेश्वर दहिवाल, गोवर्धन टाक, वीर करकोटक, हस्नोद्दीन कट्यारे तसेच नगरसेविका कविता शिंदे, राजश्री गायकवाड, संगीता मापारी, वैशाली परदेशी, अलका परदेशी, मंगल हिंगे, रुपाली सोनारे, अनिता वीर, मनिषा साळवे, पूजा पारीख, योगिता वरकड, स्नेहल धुपे व सर्व कर्मचारी उपस्थित होते. या निर्णयामुळे नाथषष्ठीत येणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून दिव्यांगांनाही आर्थिक मदत वाढल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
