दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्यावर आज सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झाले.
राजगोपालाचारी उद्यान येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमावेळी प्रारंभी मराठवाडा मुक्ती संग्रामावेळी बलिदान देऊन जे हुतात्मे झाले, त्या स्मरणार्थ उभारलेल्या हुतात्मा स्मारकाला मंत्री महोदयांच्या हस्ते पुष्पचक्र बहाल करण्यात येऊन नंतर ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
या प्रसंगी परभणीचे खासदार संजय जाधव, परभणीचे शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील, जिंतूरच्या भाजपा आमदार मेघना बोर्डीकर, पाथरीचे कॉंग्रेस आमदार सुरेश वरपूडकर, गंगाखेड चे रासपा आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, विधानपरिषद सदस्य तथा राष्ट्रवादी आमदार बाबाजानी दुर्रानी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक जयंत मीना, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ओमप्रकाश सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
या औचित्यावर भारतीय सैन्य दलात सीमेवर शत्रुशी कडवी झुंज देत सेवानिवृत्त झालेले अधिकारी व परभणीचे सुपुत्र समीर गुजर यांना निवृत्तीच्या वेळी भारत सरकार द्वारा मेन्शन इन डिस्पॅच ही पदवी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या या सोहळ्यात बहाल करण्यात आली. त्यांना मंत्र्यांच्या हस्ते रुपये सहा लाखांचा धनादेशही सुपूर्द करण्यात आला. त्याशिवाय मराठवाडा मुक्ती संग्रामावेळी निजामाला पळवून लावण्यासाठी ज्यांनी शौर्याची लढाई केली त्या मान्यवर स्वातंत्र्य सैनिकांचा, जे हुतात्मे झाले, त्यांच्या विधवा पत्नींचा विशेष सन्मान पत्र व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सहकार मंत्री अतुल सावे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक व पत्रकार आदींच्या भेटीही घेतल्या.
