दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : पालम तालुक्यातील मौजे केरवाडी येथे दोन अल्पवयीन मुलींच्या विवाहासंबंधी घातलेला घाट वेळीच रोखला गेला. गोपनीय यंत्रणेद्वारा मिळालेली माहिती, नि रोखण्यासाठी अधिकारी वर्गांनी दाखवलेली तत्परता पूरती उपयुक्त ठरली गेली हे विशेष. दरम्यान काही दिवसांपूर्वीच पालम तालुक्यातील एका जाहीर कार्यक्रमात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी “बालविवाह रोखणे ही काळाची गरज” असे वक्तव्य केले होते तथापि त्या आदेशाचे पालन होण्यापेक्षा अवघ्या कांही कालावधीतच विशेष म्हणजे त्याच तालुक्यात जिल्हाधिकारी गोयल यांच्या निर्देशालाच छेद देण्याचे काम तेथील काही लोकांनी केल्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.
बालविवाह करणे, जुळवून आणणे, त्यासाठीचा प्रयत्न करणे किंवा त्यासाठी उद्युक्त करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. अशा प्रकारचे बालविवाह जाणीवपूर्वक पार पाडले गेल्यास अल्पवयीन मुलीला व तिच्या पालकांना काय त्रास होऊ शकतो याचीही परिपूर्ण माहिती सर्वश्रुत आहे. शासनस्तरावरून त्यासाठी वेळोवेळी प्रचार व प्रसारही मोठ्या प्रमाणात केला जात असतो. जागोजागी चित्रफीती सुध्दा प्रदर्शित केल्या जातात. जनजागृतीचे हे कार्य मागील अनेक वर्षांपासून सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर सुरु असताना केरवाडीच्या ‘त्या’ सुज्ञ नागरिकांनी जाणीवपूर्वक छेद देण्याचे केलेले हे कृत्य कायदाविरोधीच म्हणावे लागेल यात शंकाच नाही.
दिल. १८ सप्टेंबर २०२२ रोजी कथित दोन्ही विवाह मुली अल्पवयीन असूनही लावले जाणार असल्याची खबर चाईल्ड १०९८ या टोल फ्री क्रमांकावरुन प्राप्त झाली. प्रसंगावधान राखत परभणी जिल्हा महिला व बालकल्याण समितीचे अधिकारी कैलास तिडके यांनी यासंबंधी कार्यरत सहकारी व पथकासह घटनास्थळी दाखल होऊन कथित बालविवाह रोखण्याचे निर्देश दिले.
गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि तत्सम अधिकारी यांच्या उपस्थितीत रितसर पंचनामे केले. त्याशिवाय ‘त्या’ दोन्ही अल्पवयीन मुलींच्या आई-वडिलांना कायदेविषयक समोपदेशन केले. ज्यामुळे सदर मुलींना होणारा त्रास, कायद्याची पायमल्ली केल्याने त्यांना होणारा दंड, भूर्दंड व अन्य त्रास विषयीच्या माहितीबरोबरच कायदेविषयक अडचणीही सर्वांसमक्ष विषद केल्या गेल्या. प्राथमिकदृष्ट्या हे दोन्ही विवाह तात्पुरते टळले असले तरी दोन्ही लग्नांमधील चारही परिवार आणि आप्तेष्टांना झालेला असह्य असा हा मानसिक त्रास व सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड आणि बदनामी हे सारे कुरघोडी करणारेच असे म्हणावे लागेल यात शंकाच नाही. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिलेल्या आदेशाचे पालन होण्यापेक्षा तेथे जाणीवपूर्वक छेद देण्याचे काम झाले नव्हे ते घडवून आणले असेच म्हणावे लागेल एवढे नक्की.
