धक्कादायक माहिती समोर…
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. महादेव मुंडे प्रकरणात पुराव्यानिशी माहिती देणारे विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्या पत्नीची आणि वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मयुरी बांगर असं बाळा बांगर यांच्या पत्नीचे नाव आहे.
यामध्ये संबंधीत महिलेने सोशल मिडीयात केलेली पोस्ट डिलीट करा म्हणून वाल्मीक कराड विनंती करत असून सदर महिला मात्र विजयसिंह बांगर यांच्यासह त्यांच्या आई-वडीलांकडून झालेल्या छळाचा पाढा वाचून दाखवत वाल्मीक कराडला मदतीची विनंती करते. यावर वाल्मीक कराडकडून मदतीचे आश्वासन देखील दिले जाते.
वाल्मिक कराड आणि विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्यातील वादातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदा घेऊन वाल्मिक कराडवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. याच आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी काही कथित कॉल रेकॉर्डिंग आणि फोटो देखील व्हायरल केले आहेत.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
– बाळा बांगर यांचे आरोप:
विजयसिंह उर्फ बाळा बांगर जे एकेकाळी वाल्मिक कराडचे सहकारी होते. त्यांनी वाल्मीक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खुलासे, तसेच कराडने अनेकांना फसवल्याचे आणि धमकावल्याचे आरोप आहेत.
– व्हायरल कॉल रेकॉर्डिंग:
बाळा बांगर यांनी काही कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल केल्या आहेत. यामध्ये वाल्मिक कराड पैशाच्या व्यवहारातून एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करत असल्याचे आणि धमकावत असल्याचे ऐकू येत आहे. तसेच, काही ठिकाणी कराडची भाषा अत्यंत अर्वाच्च असल्याचेही सांगितले जात आहे.
– महिला आणि हॉटेलमधील फोटो:
बांगर यांनी वाल्मिक कराडचा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधील एका महिलेसोबतचा फोटो देखील व्हायरल केला आहे. बांगर यांच्या मते कराडने त्यांना खोट्या बलात्कार प्रकरणात अडकवण्यासाठी अशा महिलेचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता.
– प्रशांत जोशींचा उल्लेख:
बाळा बांगर यांनी असाही आरोप केला आहे की, वाल्मिक कराडला धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी यांचीही हत्या करायची होती कारण प्रशांत जोशी यांनी कराडचा फोन उचलला नव्हता.
सत्यता आणि पडताळणी –
अनेक वृत्तसंस्थांनी व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिप्स आणि फोटोंची पुष्टी केलेली नाही. बाळा बांगर यांनी पोलिसांना या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक चाचणी करण्याची मागणी केली आहे जेणेकरून त्यांची सत्यता पडताळता येईल.
दरम्यान, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहेत. बाळा बांगर यांनी केलेल्या या आरोपांमुळे आणि व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप्स आणि फोटोंमुळे या प्रकरणात आणखी खळबळ उडाली आहे.
