दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी -रवि राठोड
पालघर :“दुर्गंधी नाही, प्लास्टिक नाही – फक्त हिरवाई आणि स्वच्छतेची ओळख असलेला पालघर जिल्हा घडवायचा आहे,” असा ठाम संकल्प वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने व्यक्त केला. शासनाच्या २५० कोटी वृक्षलागवडीच्या महायोजनेचा भाग म्हणून पालघर जिल्हा हरितमय करण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.
दुर्वेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवी मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन पालकमंत्री नाईक यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, दुर्वेश ग्रामपंचायत सरपंच आकाश कडव, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी तन्वीर शेख, ज्येष्ठ समाजसेवक वसंत चव्हाण, समाजसेवक दामूशेठ पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री नाईक म्हणाले की, पालघर जिल्ह्याची निर्मिती फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात पायाभूत सुविधा उभारून झाली पाहिजे. जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय यांसारख्या महत्त्वाच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य आणि इतर सेवांमध्येही विकासाला वेग आला आहे.
जिल्ह्याला प्लास्टिकमुक्त व दुर्गंधीमुक्त करण्यासाठी स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असून, गावागावांतून प्लास्टिक संकलन व विल्हेवाट करण्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षी वृक्षलागवडीला आणखी गती देत रस्त्यांच्या कडेला सुगंधी व आकर्षक रंगांची झाडे लावली जाणार आहेत. डोंगर हिरवेगार करण्याबरोबरच २०० हेक्टर जंगल क्षेत्राचे सौंदर्यीकरण करण्याचाही मानस आहे.
“पालघर जिल्ह्यात कोणतेही विकासकाम निधीअभावी थांबणार नाही. शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या एकत्रित प्रयत्नातून स्वच्छ, सुंदर आणि प्रगत पालघर घडविणे हा आमचा संकल्प आहे,” असे नाईक यांनी ठामपणे नमूद केले.
यावेळी पालकमंत्र्यांनी वाडा तालुक्यातील गालतरे येथील इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेज येथे भेट देऊन पाहणी केली.
