पत्नीचे मतदार यादीत दोनदा नाव; शरद पवारांच्या पक्षाने पुरावेच दिले…
मतदारयाद्यांमध्ये घोळ असल्याची टीका करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मत चोरी झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार यांच्या आमदाराच्या पत्नीचे मतदार यादीत दोनदा नाव असल्याचा पुरावाच दिला आहे.
शिरूर-हवेली मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पत्नीचे दोन वेगळ्या बुथवर मतदारयादीत नाव असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आरोप केला आहे. कटके यांच्या पत्नीचे नाव असलेल्या मतदारयाद्या देखील पक्षाकडून दाखवण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. त्यामध्ये आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पत्नी मनीषा कटके यांचे नाव बुथ क्रमांक 312, तसेच बुथ क्रमांक ३०४ या दोन्ही बुथवर मनीषा ज्ञानेश्वर कटके असा मतदारयादीत आहे. त्यावरून आमदार पत्नीचे दुबार नाव असल्याचा पक्षाकडून करण्यात आला आहे.
आमदार पत्नीने दुबार मतदान केले असेल तर शिरुर हवेली मतदारसंघात डबल मतदान करणाऱ्यांची संख्या किती असा प्रश्न देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उपस्थित करण्यात आला आहे.
भारतीय फसवणूक आयोगाचा गोलमाल बघा. शिरूर- हवेली मतदारसंघात सत्ताधारी आमदारांच्याच पत्नीचे मतदार यादीत दुबार नावं. लक्षपूर्वक पहा आणि वोट चोरी अभियानात आवर्जून सहभागी व्हा!, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आले आहे.
