भुजबळांनी थेट पुरावेच दाखवले !
मराठा समाजातील सदस्यांना बनावट आणि खाडाखोड केलेल्या कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत, असा आरोप करत मंत्री छगन भुजबळ यांनी भर बैठकीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर काही प्रमाणपत्रच सादर केली.
ही कुणबी प्रमाणपत्र बनावट असल्याचा त्यांचा दावा आहे. भुजबळ यांच्या दालनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील ओबीसी प्रश्नांवरील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. यावेळी भुजबळ यांचा रुद्रावतार बघायला मिळाला.
भुजबळ म्हणाले, कुणबी प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मी काही पुरावे सादर केले. सध्या कुणबी प्रमाणपत्रे वितरित केली जात असताना, ती कागदपत्रांवर आधारित आहेत ज्यात कागदपत्रांवर खाडाखोड करून नव्याने नोंदणी केल्या जात आहेत. मराठा समाजातील सदस्यांना कुणबी (ओबीसी) प्रमाणपत्रे मिळावीत यासाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन केली होती. मात्र बनावट आणि संशयास्पद कुणबी प्रमाणपत्रे वितरित केली जात आहेत.
या सगळ्याची चौकशी करण्यासाठी आता तशाच पद्धतीची रचना असलेली एक नवीन समिती स्थापन करावी. ही समिती न्यायमूर्ती शिंदे समितीच्या पडताळणीनंतर देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करेल, अशी मागणी मी बैठकीत केली आहे. अशी बनावट प्रमाणपत्र देणे तातडीने थांबवावे अशी मागणी ही बैठकीत केल्याचे भुजबळ म्हणाले. मागील बैठकीमध्ये भुजबळ यांनी हैदराबाद राजपत्र लागू करण्याचा शासन आदेश तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी केली होती.
समितीचे अध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, भुजबळ यांनी बैठकीत 15-20 बनावट प्रमाणपत्रे सादर केली. यानंतर अधिकाऱ्यांनी बनावट किंवा बदललेल्या कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र देऊ नये असे आदेश दिले आहेत. एकूणच छगन भुजबळ यांच्या आरोपांमुळे आणि त्यांनी दावा केलेल्या बनावट कुणबी प्रमाणपत्रांमुळे आजची ओबीसी उपसमितीची बैठक गाजली.
