दैनिक चालु वार्ता माळशिरस प्रतिनिधी -प्रा विजय गेंड
सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या सलग आणि जोरदार पावसामुळे घरकुल योजनेतील गोरगरीब लाभार्थींना बांधकाम सुरू करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. या परिस्थितीत शासनाने मानवी दृष्टिकोन ठेवून तातडीने घरकुल बांधकामासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद वाल्मीक सरतापे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कुलदीप जंगम साहेब यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सरतापे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की घरकुल योजनेतील काही लाभार्थींना पहिला हप्ता मिळालेला आहे. मात्र सततच्या पावसामुळे पाया खणणे, विटा-बांधणी, सिमेंट काँक्रीट यासारखी मूलभूत कामे ठप्प झाली आहेत.
प्रतिकूल परिस्थितीतही पंचायत समिती व ग्रामपंचायतींकडून लाभार्थ्यांवर काम सुरू करण्यासाठी दबाव आणला जात आहे व कारवाईचा इशारा दिला जात आहे. या दबावामुळे लाभार्थी मानसिकदृष्ट्या त्रस्त होत असून, शासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास हे कुटुंब हवालदिल होणार आहेत.
सरतापे यांनी सांगितले की,
“सरकारच्या घरकुल योजनेतून गोरगरीब कुटुंबांना स्वप्नातील घर मिळावे हा उद्देश आहे. मात्र प्रतिकूल हवामानामुळे वेळेत बांधकाम करणे अशक्य आहे. तरीसुद्धा दबाव आणून कारवाई केली तर लाभार्थी रस्त्यावर येण्यास भाग पडतील. अशावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) देखील गोरगरीबांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.”
त्यांनी प्रशासनाला चेतावणी दिली आहे की, लाभार्थ्यांना मुदतवाढ देऊन दिलासा न दिल्यास जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील.या मागणीमुळे घरकुल योजनेतील हजारो लाभार्थ्यांच्या मनात दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
