दैनिक चालू वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
धाराशिव /भूम (प्रतिनिधी):
वारदवाडी–भूम मार्गावरील वाकडी पुलावर दुपारी जीवघेणी घटना घडली. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या प्रचंड प्रवाहात हनुमंत कांबळे हा युवक अडकून पडला.
मोटारसायकलसह तो पुल ओलांडताना पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी वाहून गेली. मोबाईलही प्रवाहात गेला. हनुमंतने जीव वाचवण्यासाठी जवळच्या चिलांरीच्या झाडाला धरून बसून जीवाचा आकांत केला.
पोलिस-ग्रामस्थांची धाडसी सुटका
घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस निरीक्षक चोरमले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुशील कोळेकर आणि पोलीस कर्मचारी शहाबाज शेख घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक ग्रामस्थ राहुल कारभारी, अजित रगडे, विशाल लोंढे, अक्षय पाठक, श्रीराम जगताप आणि सुजित शिंदे यांनी पोलिसांना मदतीचा हात दिला. वायरोपच्या सहाय्याने जीवाची पर्वा न करता त्यांनी हनुमंतला पाण्याबाहेर काढले.
सुटका यशस्वी – कौतुकाचा वर्षाव
सुटका झाल्यानंतर हनुमंत घाबरलेल्या अवस्थेत होता. पोलिस व ग्रामस्थांनी त्याला धीर देत सुखरूप घरी रवाना केले. या धाडसी कार्यामुळे वाकडी ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
