
शरद पवारांनी राजकीय गुपितच सांगून टाकलं…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची विक्रमी 50 वी बैठक व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.
यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचे नेमकं काय समीकरण राहील याबाबत शरद पवार यांनी भाष्य केलं.
शरद पवार म्हणाले, मला सांगण्यात आलं हे कार्यकारिणीची बैठक आहे. मात्र, वार्षिक सर्वसाधारण सभेला जितकी लोकांची गर्दी असते तेवढ्या प्रमाणात या कार्यकारिणीच्या बैठकीला गर्दी झाली आहे. ही गर्दी म्हणजे शहराचं चित्र बदलत आहे. तुमच्या बाजूने अनुकूल होत आहे. याचं कौतुक असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. ठराविक कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्याच पाहिजे असं सांगितलं आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला आम्हाला जागरूक राहावे लागेल तयारी करावी लागेल.
शरद पवार पुढे म्हणाले, आपण गांधी नेहरूचे विचार मानतो. निवडणुका उद्या होतील त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मतदारांच्या समोर जाणार आहोत. इतरही काही पक्ष आहेत. त्यातील काही पक्ष देश पातळीवर आम्हाला सहकार्य करतात आहेत. तर काही पक्ष राज्यामध्ये सहकार्य करतात आहे.
मात्र, काही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत. यासंबंधीचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी लवकरच घेतील आणि अन्य मित्रपक्ष यांच्याशी सुसंवाद साधून त्यांच्यासोबत जायचं की नाही गेलो तर कार्यक्रम काय असेल किती जागा मिळतील त्या कोणत्या असतील या सगळ्यांचा निर्णय आपल्या अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी हे तुम्हा लोकांच्या विश्वासाने घेतील आणि तसे आपण निवडणुकीला सामोरे जाऊयात शरद पवार म्हणाले.
उद्या कोणासोबत युती करायची याचा निर्णय पक्ष घेईल. त्यामुळे सगळ्या जागा काय आपल्याकडे येणार नाहीत. त्यातील काही जागा मित्रांना द्याव्या लागतील. ज्या जागा आपल्याकडे येतील, तिथे स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नव्या उमेदीच्या आणि नक्की जिंकू शकेल, अशा कार्यकत्याला संधी देण्याचं काम पक्ष नेतृत्व करेल, असं शरद पवार यांनी सांगितलं.