
एकूण कलेक्शन आहे तब्बल; बॉलीवूडच्या बड्या सिनेमांना धोबीपछाड…
मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या ‘दशावतार’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत असून बॉलीवूडच्या बड्या सिनेमांना टक्कर देत ‘दशावतार’ने अवघ्या पाच दिवसांत दमदार कमाई केली आहे.
या सिनेमाचं कथानक कोकणी संस्कृती, परंपरा, याठिकाणी असलेला निसर्गरम्य परिसर आणि आपल्या जमिनीचं-निसर्गाचं संरक्षण करणारा कोकणी माणूस यावर आधारित आहे.
‘दशावतार’ या थ्रिलर सिनेमाने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे वयाच्या ८१ व्या वर्षी दिलीप प्रभावळकरांनी सिनेमात साकारलेल्या बाबुली मिस्त्रीच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. याशिवाय ‘दशावतार’मध्ये अनेक दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. या सिनेमाने पहिल्या ३ दिवसांतच जगभरात ५.२२ कोटींचा गल्ला जमावल्याचं पाहायला मिळालं. ‘दशावतार’ रिलीज झाल्यावर ‘बागी ४’, ‘मिराय’ या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं.
सोमवार ( १५ सप्टेंबर ) व मंगळवारी ( १६ सप्टेंबर ) ‘दशावतार’ने टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’पेक्षा जास्त कमाई करत बॉलीवूडकरांना धोबीपछाड केलं आहे. ‘दशावतार’ने पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी प्रारंभिक १.३० कोटींचा गल्ला जमावला आहे असं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे. या आकडेवारी बदल होऊ शकतो. प्रारंभिक आकडेवारी विचारात घेतल्यास ‘दशावतार’ सिनेमाचं कलेक्शन ७.६ कोटींच्या घरात पोहोचलं आहे.
प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता ‘दशावतार’चे शोज देखील वाढवण्यात आले आहेत. याशिवाय ‘दशावतार’सह प्रदर्शित झालेल्या ‘बिन लग्नाची गोष्ट’ आणि ‘आरपार’ या दोन्ही सिनेमांना सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, ‘दशावतार’बद्दल सांगायचं झालं तर, या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी केलं आहे. यामध्ये दिलीप प्रभावळकर यांच्यासह सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, भरत जाधव, महेश मांजरेकर, सुनील तावडे, आरती वडगबाळकर, रवी काळे आणि विजय केंकरे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.