
खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांची माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करताना काळजी घेण्याचा सल्लाही दिला.
यावेळी कलमाडी यांच्या पत्नी मीरा, मुलगा सुमीर उपस्थित होते. पवार यांच्या समवेत विठ्ठल मणियार, अंकुश काकडे होते.
पवार आपल्याला भेटायला आले म्हटल्यावर हाऊ आर यु, अशी विचारपूस कलमाडी यांनी पवारांची केली. त्यावर पवार यांनी हसून आय अॅम फाइन, असे उत्तर दिले. तुम्ही लवकर बरे व्हा, असेही त्यांना सांगितल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी कलमाडी यांच्या प्रकृतीविषयीची सविस्तर माहिती पवार यांना दिली.
दरम्यान, कलमाडी यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळेच त्यांनी यावर्षीच्या पुणे फेस्टिव्हललाही उपस्थिती दर्शविली नाही, त्यांनी आपला शुभेच्छा संदेश पाठवून दिला होता, तो अॅड. अभय छाजेड यांनी वाचून दाखवला होता, त्यातही त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचा उल्लेख केला होता.