
भुजबळांच्या आरोपांना सुळेंचं प्रत्युत्तर; ती बैठक कुठे झाली व किती…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातील निर्णयावर ओबीसी नेते टीका करत आहेत.
या घडामोडी सुरू असताना ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर एक गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
‘अंतरवली सराटीत वर्षभरापूर्वी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांवर करण्यात आलेल्या दगडफेकीत शरद पवार यांच्या पक्षातील एका आमदाराचा हात होता’, असा गंभीर आरोप छगन भुजबळ यांनी गुरुवारी केला. त्यांच्या या आरोपांना आता खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. छगन भुजबळांनी आरोपासंदर्भात पुरावे द्यावे, ती बैठक कुठे झाली? किती वाजता झाली? त्यात कोणाचा सहभाग होता?’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
अंतरवाली सराटीतील हल्ल्यामागे पवारांच्या आमदाराचा हात होता, असा आरोप भुजबळांनी केला असल्याचा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांना विचारला. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, “छगन भुजबळ कधी बोलले? कारण काल मी त्यांना या संदर्भात फोन केला होता. तेव्हा ते बोलले की मी असं बोललो नाही. पण तरीही मी हात जोडून विनंती करते की छगन भुजबळ हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यामुळे आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीबाबत किंवा त्या व्यक्तीच्या मताबाबत आपण काही वेगळं मत मांडण्याएवढी मोठी व्यक्ती नाही.
पण मी आता विरोधी पक्षात असल्याच्या भूमिकेतून छगन भुजबळांना विचारते की छगन भुजबळ असोत किंवा सरकारमधील आणखी कोणी असो जे महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही होते. त्या सर्वांना मला विचारायचं आहे की महाविकास आघाडीत असताना तुम्ही शरद पवारांना नेता मानत होतात. मग शरद पवार ज्या पक्षाचं नेतृत्व करायचे त्याच पक्षात तुम्ही होता. त्याच पक्षातून तुम्ही मंत्री झालात, उपमुख्यमंत्री झालात. पण तुम्ही जेव्हा महाविकास आघाडीवर टीका करतात, त्याच महाविकास आघाडीत तुम्ही मंत्री होतात, तेव्हा तुम्ही का बोलला नाहीत?”, असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला.
तेव्हा बैठकीत काय झालं? या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही. शरद पवार मुख्यमंत्र्यांशी बोलले की नाही? हे मलाही माहिती नाही. पण तेव्हा छगन भुजबळ मंत्रिमंडळात होते, मग याबाबत छगन भुजबळांनी शरद पवारांबरोबर चर्चा का नाही केली? त्यामुळे माझी हात जोडून भुबळांना विनंती आहे की, तुम्ही हा खूप मोठा आरोप शरद पवारांच्या पक्षावर केला, त्या पक्षात मी देखील काम करते. या आरोपाचा पुरावा काय? ही बैठक कधी झाली? कुठे झाली? किती वाजता झाली? त्या बैठकीत कोण होतं? हे त्यांनी स्पष्ट करावं. तुम्ही सत्तेत आहात, त्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल. तुम्ही याबाबत पारदर्शकपणे माहिती सांगावी. तुमच्याकडे काही पुरावा असेल तर मग तुम्ही पोलिसांत तक्रार का केली नाही?, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.