
संजय राऊतांची मोदींवर टीका !
लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल चढवला. त्यांनी गेल्यावेळेप्रमाणं पुन्हा एकदा प्रझेंटेशनद्वारे कशा पद्धतीनं गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांची नाव टार्गेटेड पद्धतीनं डिलीट केली हे कथित पुराव्यानिशी दाखवून दिलं.
गेल्यावेळी मतदारांची नाव चुकीच्या पद्धतीनं कशी याद्यांमध्ये कशी घुसवल गेली हे त्यांनी दाखवलं होतं. तर काल कशी चुकीच्या पद्धतीनं डिलीट केली हे दाखवून दिलं. त्यांच्या या पत्रकार परिषदेवर भाष्य करताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवचलं आहे.
संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आहेत, हे एक घटनात्मक आणि संविधानिक पद आहे. राहुल गांधी यांच्यात हिंमत आहे जी आमच्या प्रधानमंत्रीमध्ये नाही. एकाच वेळेला शेकडो पत्रकारांना घेऊन भूमिका मांडणं ही हिंमत त्यांच्यात आहे. मोदींना 75 वर्षे झाली पण अजूनपर्यंत गेल्या अकरा वर्षांत त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यामुळं राहुल गांधींवर टीका करतात त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की राहुल गांधी सातत्यानं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. गेल्या काही काळापासून ते निवडणूक आयोगाचा भ्रष्टाचार, निवडणूक आयोगातील घोटाळे, मतचोरी याच्यावर बोलत आहेत आणि काल त्यांची ही दुसरी पत्रकार परिषद होती.
राहुल गांधींनी काल पुरावे दिले आहेत की कशा प्रकारे मतं डिलीट केली जातात एका विशिष्ट समाजाची, जिथं काँग्रेस भाजप विरुद्ध जिंकू शकते तिथे मतदार यादीतून बोगस फोन नंबरवरून, वेगवेगळ्या राज्यातून मतदार यादीतून शेकडो हजारो नावं डिलीट केली गेली. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील राजुरी मतदारसंघ किंवा कर्नाटकातला अळंद मतदार संघ असो, त्यांनी इथले पुरावेस दिलेत. खरं म्हणजे या पुराव्यावर भारतीय जनता पक्षाची बोलती बंद व्हायला पाहिजे होती, पण भारतीय जनता पक्ष हा कोडगा पक्ष आहे. यांचं सर्व राजकारण घोटाळे आणि अशा प्रकारच्या चोऱ्यामाऱ्या अशावरच टिकून आहे.
राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब अजून टाकलेला नाही, काल त्यांनी सहज पत्रकार परिषद घेतली. हायड्रोजन बॉम्ब जेव्हा टाकला जाईल तेव्हा वाराणसीसह देशामध्ये हादरे बसतील, अशा शब्दांत संजय राऊत यांनी राहुल गांधींची पाठराखण करत ते येत्या काही दिवसांत आणखी एक पत्रकार परिषद घेत थेट मोदींच्या वाराणसी या मतदारसंघातील कथित घोटाळ्यांवर भाष्य करतील, असं राऊत यांनी सूचकपणे सांगितलं आहे.