
गोपीचंद पडळकरांच्यानंतर शिंदेंच्या शिलेदाराची जीभ घसरली !
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या विषयी अश्लाघ्य वक्तव्य केल्याने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा निषेध होत असतानाच एकनाथ शिंदेंचे खासदार, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के हे संजय राऊतांवर तुटून पडले आहेत.
मात्र, टीका करताना त्यांनी संजय राऊत यांची पात्रता ही राहुल गांधींनी पाळलेला डाॅगची असल्याचे म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सामना’ सुरू केला. त्यानंतर उद्धव ठाकरे संपादक झाले. मुख्यमंत्री झाल्यावर रश्मी ठाकरे संपादक झाल्या; पण संजय राऊत मात्र कायम कार्यकारी संपादक पदावरच राहिले. पाच वर्ष नोकरी केली की बढती मिळते. पण पात्रता नसल्यामुळे राऊतांना संपादक होता आले नाही. मग त्यांनी इतरांची औकात काढण्याची गरज नाही, अशी सल्लाही म्हस्के यांनी राऊतांना दिला.
माजी खासदार राजन विचारे आणि केदार दिघे यांनी पत्रकार परिषद घेत म्हस्केंना प्रतिउत्तर दिले होते. त्यावरून म्हस्के यांनी म्हटले की, पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो शेजारी आनंद दिघेंचा फोटो होता मग आता राऊत विचारेंवर कारवाई करणार का? अनंत तरे यांना आनंद दिघे यांनी ठाणे शहराचा महापौर केला. त्या तरे यांना उपनेता करीत दिघे यांच्या डोक्यावर बसविण्याचे काम केले, राऊत यांनी केल्याचा आरोप देखील म्हस्के यांनी केला.
काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्ला चढवताना म्हस्के म्हणाले, राहुल गांधी विदूषकाचे काम करतात, डोंबाऱ्याचे खेळ खेळतात. स्वतःची हार लपवण्यासाठी आणि खोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.
जागा दाखवून देऊ
संजय राऊतने आनंद दिघे यांना नेहमी पाण्यात बघितलं. त्याच्या एका मुलाखतीमुळे दिघे यांना टाडा लागला होता. सांभाळून बोल अन्यथा तुला तुझी जागा दाखवून द्यावी लागेल,’ असा इशारा म्हस्के यांनी दिला. तसेच संजय राऊतची पात्रता नाही. तो आमच्या जीवावर खासदार झाला, असे देखील ते म्हणाले.