
सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेटचा जीआर काढला आहे, मात्र त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा विरोधात ओबीसी समाज असं चित्र निर्माण झालं आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या हैदराबाद गॅझेटला ओबीसी समाकडून जोरदार विरोध होत आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका अशी त्यांची मागणी आहे.
तर दुसरीकडे आता याच गॅझेटवरून राज्यात आणखी एक संघर्ष निर्माण झाला आहे, तो म्हणजे बंजारा समाज आणि आदिवासी समाज आमने-सामने आले आहेत. हैदराबाद गॅझेटनुसार आमचा समावेश हा एसटीमध्ये करावा अशी मागणी आता बंजारा समाजानं केली आहे. तर बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजानं जोरदार विरोध केला आहे. या मागणीविरोधात आदिवासी समाजाचे नेते एकवटले आहेत.
दरम्यान राज्यात सुरू असलेल्या या सर्व वादावर आता अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. समाज तुटू नये, समाज तुटला तर अराजक निर्माण होते, असं मकरंद अनासपुरे यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी ही सरकारला विनंती असं देखील अनासपुरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अनासपुरे?
राज्यात सध्या सुरू असलेल्या ओबीसी विरोधात मराठा आणि बंजारा विरोधात आदिवासी वादावर मकरंद अनासपुरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समाज तुटू नये, समाज तुटला तर अराजक निर्माण होते. आपण भावंडांसारखे आणि एक समाज म्हणून राहतो. जेव्हा आपल्यावर संकट येते, तेव्हा एकत्रितपणे आपण धावून जातो. एका मोळीची आणि एका लाकडाची गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे. मोळीच्या अवस्थेत आहोत तोपर्यंत तोडणे शक्य नाही आणि लाकूड होत गेलो तर तोडणं सोप होईल. गावकी आणि भाऊकी एकत्र होती ती अशीच एकत्र रहावी हीच मनापासून भावना आहे. असं मकरंद अनासपुरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, पाण्याची चळवळ आम्ही केवळ चालवली नाही तर त्याचा दशकपूर्ती सोहळा साजरा केला आहे. यंदा पाऊस जास्त झाला, निसर्गाचा अंदाज कोणालाही येत नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, सरकारने जास्तीत जास्त मदत करावी, अशी मागणी यावेळी अनासपुरे यांनी केली आहे.