
रोहित पवारांच्या संतापावर काय म्हणाल्या अंजली दमानिया…
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जामखेडमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांसोबत संयुक्त आमसभा घेतली.
या आमसभेत एका अधिकाऱ्याच्या वागणुकीमुळे वातावरण तापले आणि रोहित पवारांनी संतापत त्या अधिकाऱ्याला भर सभेत झापलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, रोहित पवारांच्या या संतापावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपले मत मांडले आहे, तसेच, जसे काका तसाच पुतण्या, अस म्हणत आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.
जामखेडमधील सार्वजनिक समस्या आणि विकासकामांबाबत नागरिकांची थेट माहिती घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी प्रशासनासोबत बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान एका कार्यकर्त्याने एका कामासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. मात्र संबंधित अधिकाऱ्याने समाधानकारक उत्तर दिले नाही, यानंतर रोहित पवारांचा पारा चढला व ते त्या अधिकाऱ्यावर मोठ्या आवाजात भडकलेले पाहायला मिळाले. तक्रार करणारे नागरिक बावळट आहेत का? असा प्रश्न करत ते स्पष्ट शब्दांत अधिकाऱ्यावर ओरडताना पाहायला मिळाले.
जसे काका तसाच पुतण्या ? रोहित पवारांची ही काय भाषा? महाराष्ट्रात सरकारी कामे निकृष्ट असतात यात काहीच शंका नाही. यावर अधिकाऱ्यांना कडक शब्दात जाब विचारला पाहिजे यातही काही शंका नाही पण ही भाषा? अधिकाऱ्यांना म्हणणं “काय गोट्या खेळत होता काय ?” “खिशातून हात काढ ” “मिजस्खोर तू बोलू नकोस तुला सांगतोय ” हे शब्द रोहित पवार लोकांदेखत अधिकाऱ्यांना बोलतात ? ही कामे स्वतः पाहून त्या कामाची आणि त्या अधिकाऱ्या विरुद्ध कडक कारवाईची मागणी करणं योग्य आहे. पण सार्वजनिक अपमान करणं शोभतं का? अशी टीका अंजली दमानिया यांंनी रोहित पवार यांच्यावर एक्सवर पोस्ट करत केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, “भविष्यात कोणत्याही नागरिकाला त्रास होता कामा नये, कामं वेळेत आणि नियमानुसार झाली पाहिजेत, हे आमचं धोरण आहे. जर कुणी हलगर्जीपणा केला, तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. प्रशासनाला याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. “काही अडचणी धोरणात्मक पातळीवरील आहेत, त्यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत. पण कामात ढिलाई सहन केली जाणार नाही,” असे त्यांनी म्हटले.