
आठवडाभर थांबा; रोहित पवार, सुषमा अंधारेंना अंजली दमानियांचा सूचक इशारा…
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या भाजपला स्वाॅफ्ट काॅर्नर देतात, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यावरून आमदार रोहित पवार यांनी देखील दमानिया यांच्या हेतू बद्दल कुठलीही शंका नाही परंतु त्यांच्या भूमिका सिलेक्टिव्ह असतात याबद्दल मात्र प्रचंड चर्चा आहेत, असे म्हणत त्यांना तीन प्रश्न विचारले.
ज्यात भाजपशी निगडीत त्यांच्या भ्रष्टाचार, घोटाळ्याबाबत घेतली नाही.
पवार, अंधारे यांच्या आरोपानंतर दमानिय यांनी ‘सध्या मी एका खूप मोठ्या विषयावर काम करत आहे. त्यामुळे मी रोहित पवार, सुषमा अंधारे यांना विनंती करते की एक आठवडा थांबा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देईन. पण सध्या माझ्याकडे वेळ खरच खूप कमी आहे.’, असे प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आठवडाभरात दमानिया या मोठा घोटाळा बाहेर काढणार अशी चर्चा सुरू आहे.
तसेच दमानिया यांनी ट्विट करत, ‘महाराष्ट्राच्या दोन विद्वान नेत्यांना माझे आदरपूर्वक उत्तर, असे म्हणत माझ्या कृतींबद्दलच्या त्यांच्या समजुतींबद्दल, किंवा माझ्या हेतूंबद्दलच्या त्यांच्या गृहीतकांबद्दल, त्यांच्याशी वाद घालून उपयोग नाही. जे योग्य आहे ते करण्याचे प्रयत्न करावे आणि पुढे जावे.’, असे देखील म्हटले आहे. तसेच आणि हो, या दोन्ही नेत्यांनी कुठचाच विषय, ना कधी लावून धरला, ना कधी तडीस नेला, असा टोला देखील लगावला
सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
अंजली दमानिया या व्यक्तिरेखे बद्दल मला कायमच कुतूहल वाटत राहतं.चंद्रशेखर बावनकुळे आणि मेघा इंजीनियरिंग कंपनी याच्या संबंधाने प्रचंड जोरात चर्चा सुरू झाली. ज्या मेघा इंजीनियरिंग कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देण्यावरून मा. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले मात्र दमानियांनी बावन्नकुळेचा ब सुद्धा उच्चारला नाही. पण याच दमानिया काल जयंत पाटील यांच्याबद्दल वापरलेल्या अत्यंत विषारी भाषेबद्दल चकार शब्दाने व्यक्त झाल्या नाहीत. मात्र आ. रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघात निकृष्ट दर्जाचे काम झाले यावर जाब विचारला की लगेच त्या मैदानात उतरल्या… म्हणजे भाजपचे वक्ते त्यांची शिवराळ भाषा, भाजपच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार दिसत नाहीत आणि पवार किंवा ठाकरे आडनाव समोर असले की लढण्याची एकदम शिरशिरी येते. फारच अनाकलनीय गूढ आहे बाबा.
रोहित पवार यांनी विचारले तीन प्रश्न
रोहित पवार यांनी तीन प्रश्न मांडत त्यावर अंजली दमानिया यांनी भूमिका मांडून गैरसमज दूर करावेत असे आवाहन केले आहे.
– राज्यातल्या शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्र्यांच्या बेडरूममधील गादी आणि सोफ्यासाठी २० लाख रु. खर्च केले जातात हे योग्य आहे का? मुख्यमंत्र्यांनी शेकडो कोटी रु. देऊन जाहिरातबाजी करणं योग्य आहे का?
– मेघा इंजिनिअरिंग कंपनीने अवैध उत्खनन केलं म्हणून तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी ९५ कोटींचा दंड ठोठावून त्याचं साहित्य जप्त केलं, परंतु महसूलमंत्र्यांनी मात्र केवळ १७ लाख रु. दंड भरण्यास सांगून जप्त केलेलं साहित्य परत करण्याचे आदेश दिले, हे योग्य आहे का?
– सिडको ची ५००० कोटी रुपयांची जमीन मंत्री संजय शिरसाट यांनी बेकायदेशीरपणे बिवलकर नावाच्या खाजगी व्यक्तीच्या घशात घातली. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे १२००० पानांचे पुरावे देऊनही मुख्यमंत्री याप्रकरणी भूमिका घेत नाहीत, हे योग्य आहे का? अशी विचारणा केली आहे.
या विषयांवर आपण भूमिका मांडून आपल्या भूमिकांवाबत शंका घेणाऱ्यांचे गैरसमज दूर करावेत… अन्यथा हे शंका घेणारे आपणास अण्णा हजारे यांच्या पंक्तीत बसवतील, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे,