
व्हायरल कॉल रेकॉर्डिंगवर लक्ष्मण हाकेंचा खुलासा !
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने हाके यांना त्यांच्या सामाजिक कार्यात योगदान म्हणून म्हणून पैसे देऊ केले.
मात्र, लक्ष्मण हाके त्याला म्हणाले, “मी अकलुजला आल्यावर द्या किंवा पुण्यातही तुम्ही मला भेटू शकता. कारण मी पुण्यातच राहतो. यावर तरुणाने यूपीआयद्वारे पैसे देतो असं सांगितल्यानंतर हाके यांनी त्यांच्या ड्रायव्हरचा यूपीआय लिंक्ड मोबाईल नंबर दिला. तसेच ते म्हणाले, “मी बँक खात्यावर पैस घेत नाही. मुळात माझ्याकडे बँक खातं नाही. मी यूपीआय वापरत नाही.”
लक्ष्मण हाके तरुणाला म्हणाले, “मी दिलेल्या यूपीआय नंबरवर तुम्ही पैसे पाठवू शकता. कारण हा आपल्या मित्राचाच नंबर आहे. किती पैसे पाठवताय?” यावर तरुणाने लक्ष्मण हाके यांना शिवीगाळ केली आणि ‘सामाजिक कार्याच्या नावाखाली पैसे घेताना लाज कशी वाटत नाही?’ असा प्रश्न उपस्थित केला. या कॉलचं रेकॉर्डिंग सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यावर आता हाके यांनी खुलासा केला आहे.
लक्ष्मण हाकेंकडून खुलासा
लक्ष्मण हाके यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “मला त्या कॉल रेकॉर्डिंगबाबत खुलासा विचारण्याऐवजी ज्यने मला फोन केला होता त्याला जाब विचारला पाहिजे. तुम्ही त्या इसमाला विचारा की लक्ष्मण हाके यांना बदनाम करण्याचा तुमचा हेतू आहे का? मी काही पैसे मागायला फोन केला नव्हता. त्यामुळे माझ्या हेतूविषयी शंका घेण्याऐवजी पैसे देऊ करणाऱ्याचा हेतू काय होता ते तपासा. लक्ष्मण हाकेला बदनाम करणं हाच त्याचा हेतू होता का?
माझं आंदोलन बदनाम करू नका : लक्ष्मण हाके
ओबीसी आंदोलक हाके म्हणाले, “मला बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. परंतु, मला कितीही बदनाम केलं तरी माझी चळवळ थांबणार नाही. मी जे प्रश्न उपस्थित करतोय ते चालूच राहील. माझं आंदोलनही चालू राहील. माझ्या आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, मला या लोकांना एवढंच सांगायचं आहे की मला बदनाम करायचं असेल तर करा, त्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. माझं आंदोलन बदनाम करायचा प्रयत्न करू नका.