
सत्तेच्या सावलीत वाढलेले साम्राज्य जमीनदोस्त…
आयुष कोमकरच्या खुनानंतर पोलीस, महापालिका प्रशासनाने जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे. पोलीस प्रशासनाने आंदेकर कुटुंबीयांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे, तर महापालिकेने त्यांनी हफ्त्यासाठी सुरू केलेल्या अनधिकृत व्यवसायांच्या साम्राज्यावर हातोडा मारायला सुरुवात केली आहे.
सोमवारीही काही अनधिकृत शेड्स आणि फ्लेक्स महापालिकेने काढून टाकले. मात्र, पालिकेने याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही प्रतिक्रिया किंवा माहिती दिली नाही.
अनधिकृत मासळी बाजार पाडल्यानंतर सोमवारी आंदेकरांच्या प्रभावक्षेत्रात अतिक्रमण कारवाई करण्यात आली. येथील टपऱ्या, स्टॉल, शेड्स, अनधिकृत फलक पाडले. आंदेकर कुटुंब नाना पेठेत वास्तव्यास असून, या परिसरातील व्यापाऱ्यांकडून, पथारी व्यावसायिकांकडून खंडणी वसूल केल्याचा आरोपही आंदेकर टोळीवर असून, तसे तपासातूनही समोर आले आहे.या परिसरात आंदेकरांचे अनधिकृत मार्केट, फ्लेक्स, टपऱ्या आहेत.
यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याची कल्पना असूनही महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, मुख्य अतिक्रमण विभाग, आकाशचिन्ह परवाना विभाग, बांधकाम विभागाने एवढी वर्षे कारवाई केली नाही. मात्र, मागील आठवड्यात पोलिसांनी आंदेकरांच्या मासळी बाजारावर हातोडा मारला. त्यानंतर पालिकेने सोमवारी येथील अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या, शेड पाडून टाकल्या.
मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण किंवा बांधकाम विभागाने या कारवाईची माहिती न देता हा नियमित कारवाईचा भाग असल्याचा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे एरवी छोट्या- मोठ्या कारवाईनंतर प्रसिद्धिपत्रक काढणाऱ्या पालिकेने याबाबत का मौन बाळगले, याची चर्चा सुरू आहे.