
भरसभेत केलं मोठं वक्तव्य !
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे शरद पवार यांची साथ सोडण्याची शक्यता आहेत.
नारायण पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. सोमवारी नारायण पाटील यांनी शिंदे सेनेच्या मेळाव्याला हजेरी लावली. त्याशिवाय यापुढील निवडणुका एकनात शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचे वक्तव्य केलेय. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांना मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जातेय. विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांनी करमाळ्यात संजय शिंदे यांचा पराभव केला होता.
सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. करमाळ्याचे शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात हजेरी लावली. नुसती हजेरी लावली नाही तर पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी यापुढच्या निवडणूका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या घोषणेमुळे शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे.
सोमवारी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये करमाळा येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा झाला. त्यामध्ये आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेसोबत काम करणार असल्याचे म्हटले आहे. मोहोळ आमदार राजू खरे हे यापूर्वीच शिंदे यांच्यात गोटात दाखल झाले आहेत. त्यानंतर आता करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे देखील शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भविष्यात एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्रच काम करणार आहोत. कुठल्याही गटातटाचा पक्षाचा विचार न करता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी जाहीर केले आहे. आमदार पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. आमदार पाटील यांच्या या भूमिकेमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.