
13 वर्षांच्या चिमुरड्याचा 94 मिनिटांचा थरार !
फक्त 13 वर्षांचा मुलगा, ज्याच्या हातात अजून पेन असायला हवं होतं, डोळ्यात खेळण्यांची चमक असायला हवी होती, अंगणात मित्रांसोबत हशा दंगामस्ती असायला हवी होती. पण नियतीने त्याचं बालपण वेगळ्याच दिशेने ढकललं.
दिल्ली विमानतळावर रविवारी एक थरारक घटना घडली. अफगाणिस्तानातील अवघ्या 13 वर्षांच्या मुलाने काम एअरच्या विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून तब्बल 94 मिनिटांचा जीवघेणा प्रवास केला आणि तो सुखरूप दिल्लीला पोहोचला. हा प्रकार ऐकून विमानतळावरील अधिकारी अवाक झाले.
नेमकं झालं काय?
अफगाणिस्तानातील कुंदूज प्रांताचा हा चिमुकला, आयुष्याच्या ओझ्याखाली इतका दबला गेला की, त्याने मृत्यूला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. काबूल विमानतळावरील गोंधळात तो हळूच आत शिरला आणि विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये जाऊन लपला. त्याच्या मनातलं स्वप्न साधं होतं. कुठेतरी दूर, सुरक्षित ठिकाणी पोहोचायचं. कदाचित इराण, असं त्याला वाटलं असेल. पण त्याच्या नशिबाने त्याला थेट भारतात आणलं. 94 मिनिटं… म्हणजे तासाभराहून जास्त काळ तो मुलगा मृत्यूच्या विळख्यात होता. 10,000 फूट उंचीवर श्वास घेण्यास हवा नाही, थंडगार वारे हाडं गोठवणारे, शरीराला आधार नसलेली अरुंद जागा. अशा परिस्थितीत जिवंत राहणं जवळपास अशक्यच. जगभरात अशा wheel-well stowaway प्रकारातील बहुतांश प्रवासी वाचत नाहीत. पण हा छोटासा जीव मात्र थरथरत का होईना, पण जगला.
दिल्ली विमानतळावर विमान उतरलं तेव्हा कर्मचाऱ्यांच्या नजरेस तो मुलगा टॅक्सीवेवर दिसला. अंग थरथरत होतं, डोळ्यांत भीती होती, पण तरीही तो श्वास घेत होता. CISF जवानांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने सांगितलं, मी कुणाच्याही नजरेस न पडता विमानाच्या चाकांमध्ये शिरलो. एवढ्या लहान वयात उच्चारलेले हे शब्दच आयुष्याच्या वेदना सांगून गेले.
विमानतळावर उघडकीस आला प्रकार
रविवारी सकाळी 11.10 वाजता काबूलहून आलेले आरक्यू-4401(RQ-4401) हे विमान दिल्ली विमानतळावर उतरले. लँडिंगनंतर विमान टॅक्सीवेवर असतानाच विमान कंपनीच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नजरेस एक मुलगा थरथरत चालताना दिसला. तत्काळ सुरक्षा नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर CISF जवानांनी मुलाला ताब्यात घेऊन टर्मिनल-3 वर चौकशीसाठी नेले. घटनेनंतर विमानाची काटेकोर तपासणी करण्यात आली. लँडिंग गिअरमध्ये मुलाकडचा असल्याचा संशय असलेला लाल रंगाचा स्पीकरही सापडला. सर्व सुरक्षा तपासणीनंतर विमानाला परवानगी देण्यात आली. दुपारी सुमारे 4 वाजता या मुलाला पुन्हा काबूलला पाठविण्यात आले.