
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (२२ सप्टेंबर) नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आणि अलीकडेच सरकारने लागू केलेल्या नवीन पिढीतील जीएसटी सुधारणांचे कौतुक केले.
या सुधारणांनंतर, चार स्तरांतील जुनी कर रचना कमी करून फक्त दोन प्रमुख दरांमध्ये (५% आणि १८%) एकत्रित करण्यात आली आहे.
मोदींनी ‘एक्स’वर पोस्ट करताना म्हटले, या सणासुदीच्या काळात चला, आपण ‘जीएसटी बचत उत्सव’ साजरा करूया! कमी जीएसटी दरामुळे प्रत्येक कुटुंबाला जास्त बचत आणि व्यापाऱ्यांना अधिक सुलभता मिळेल.’
त्यासोबतच त्यांनी देशाला उद्देशून लिहिलेले खुले पत्रही प्रसिद्ध केले. त्यांनी लिहिले –
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
नमस्कार!
नवरात्रीच्या शुभारंभी मी आपणा सर्वांना व आपल्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. हा सण आरोग्य, आनंद व समृद्धी घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो.
या वर्षीचा सणासुदीचा काळ आणखी आनंद घेऊन आला आहे. २२ सप्टेंबरपासून ‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा’ लागू झाल्या आहेत, ज्यामुळे देशभरात ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू झाला आहे.
या सुधारणांचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला — शेतकरी, महिला, युवक, गरीब, मध्यमवर्गीय, व्यापारी व सूक्ष्म-लघु उद्योग (MSMEs) — थेट होणार आहे. या सुधारणा गुंतवणूक वाढवतील व प्रत्येक राज्य आणि प्रदेशाचा विकास वेगाने घडवतील.
महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आता जीएसटीचे फक्त दोन प्रमुख दर — ५% आणि १८% — असतील.
देशभरातील दुकानदार ‘तेव्हा आणि आता’ असे बोर्ड लावून ग्राहकांना फरक दाखवत आहेत, हे अत्यंत आनंददायी आहे.
गेल्या काही वर्षांत २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले असून ‘नव-मध्यमवर्ग’ तयार झाला आहे.
तसेच, सरकारने वार्षिक ₹१२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर ठेवून मध्यमवर्गीयांनाही दिलासा दिला आहे.
कर कपात आणि नवीन जीएसटी सुधारणा मिळून लोकांना सुमारे ₹२.५ लाख कोटींची बचत होणार आहे.
यामुळे घरखर्च कमी होईल आणि घर बांधणे, वाहन खरेदी, उपकरणे विकत घेणे, रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे किंवा सुट्टीसाठी प्रवास करणे अधिक सोपे होईल.
२०१७ मध्ये सुरू झालेला ‘एक देश, एक कर’ हा प्रवास भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा होता. नवीन सुधारणा ही प्रणाली आणखी सोपी करत असून लोकांच्या हातात जास्त बचत पोहोचवत आहेत.
कमी कर, कमी दर आणि साधे नियम यामुळे विशेषतः MSME क्षेत्रात विक्री वाढेल, नोकऱ्या निर्माण होतील आणि संधी विस्तारतील.
आपले सामूहिक ध्येय आहे ‘विकसित भारत २०४७’. त्यासाठी आत्मनिर्भरतेच्या मार्गाने चालणे अत्यावश्यक आहे. या सुधारणा देशातील स्थानिक उत्पादन व उद्योगांना बळकट करतील आणि ‘आत्मनिर्भर भारत’ घडवतील.
या निमित्ताने, मी आपणा सर्वांना आवाहन करतो की या सणासुदीला आपण ‘स्वदेशी’ उत्पादने खरेदी करूया. आपल्या कारागिरांनी, कामगारांनी आणि उद्योगांनी बनवलेली उत्पादने विकत घेतल्याने त्यांच्या कुटुंबांचे पोट भरते, तसेच युवकांसाठी रोजगारनिर्मिती होते.
मी व्यापाऱ्यांना व दुकानदारांना आवाहन करतो :
‘जे विकू ते स्वदेशी, जे विकत घेऊ ते स्वदेशी!’
राज्य सरकारांनीही गुंतवणूक वातावरण सुधारण्यासाठी उद्योग व उत्पादनास प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती आहे.
शेवटी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
‘जीएसटी बचत उत्सव’ तुमच्या जीवनात आनंद व समृद्धी आणो.
नरेंद्र मोदी