
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून बंडखोरी केलेले आबा बागुल यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी बागुल हे भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात होतं.
मात्र तो प्रवेश होऊ शकला नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बागुल यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या प्रवेशाचे संकेत देणार विधान कुठेतरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील केला आहे.
उपमहापौर आणि सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आबा बागुल हे महाविकास आघाडीकडून पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक होते. मात्र ही जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्याने आबा बागुल हे नाराज होते.
त्यानंतर त्यांनी अपक्ष विधानसभेची निवडणूक देखील लढवली. यामुळे काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पुण्यातील तीन बंडखोर नेत्यांवर कॉग्रेसने विधानसभा निवडणुकीदरम्यान कारवाई केली होती. त्यातील माजी महापौर राहिलेल्या कमल व्यवहारे यांना काँग्रेसने पुन्हा पक्षात घेतलं आहे. मात्र आबा बागुल यांच्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
अशातच आबा बागुल यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या नवरात्र महोत्सवाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह राज्यमंत्री माधुरी मिसाळ देखील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “आबा बागुल माझ्याकडे मागेही एकदा आले होते ते परवा मुंबईला देखील आले होते. आज आबा बागुल यांच्याकडे केवळ आई महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन घ्यायला आलो आहे. याचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये. त्यांचं प्रेम आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या कार्यक्रमाला यावं असं त्यांना वाटतं. त्यांनी यासाठी कोणताही राजकीय संदर्भ दिला नाही,
आमच्या नेत्या माधुरीताई मिसाळ इतक्या प्रगल्भ आहेत. त्या कधीही कोणाच्याही पक्षामध्ये येण्याला विरोध करणार नाहीत. कारण त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. भाजपाचे कार्यकर्ते कधीही कोणी पक्षात येईल त्याला नाही म्हणू शकत नाहीत. आमचा पक्ष वाढतो पक्ष वाढीसाठी कोणालाही स्थान आहे, कुणीही पक्षामध्ये येऊ शकतो. असं म्हणतं एका प्रकारे बावनकुळे यांनी बागुल यांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे.