
ठाकरेंचा आमदार एकनाथ शिंदेंसमोर संतापला; म्हणाला तुमच्या…
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत निधीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले. थेट पोस्टर दाखवत माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
तुमच्या आमदारांना तुम्ही निधी दिला, त्यांनी स्वत:चा विकास केला. त्यांना आता तुम्ही त्यांना समज द्या असं ते बैठकीत म्हणाले. मी आमदार नसताना 20 कोटींचा निधी मिळतो असं विधान सदा सरवणकर यांनी केलं होतं. त्यावरून विद्यमान आमदार महेश सावंत आक्रमक झाले आहेत. महेश सावंत यांनी 20 कोटींची कामं मतदारसंघात कुठे झालेत याची खतरजमा करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आगामी काळात सावंत आणि सरवणकरांमधला वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.
महेश सावंत बैठकीत म्हणाले की, “माजी आमदार बोलत आहे की आम्हाला 20 कोटी भेटतात आणि आम्हाला निधी मिळत नाही. तुमच्या नावाने दादागिरी सुरू आहे. पण आम्ही पण दादागिरीतून आलो आहे. माजी आमदारांना साहेब तुम्ही खूप निधी दिला आहे पण कामे झाली नाही, निधी स्वतःचा विकास करण्यासाठी वापरला आहे. साहेब तुम्ही तुमच्या माजी आमदारांना समज द्यावी कानमंत्र द्या.आम्हाला निधी द्या आम्ही अनेक पत्रकं दिली आहेत.
महेश सावंत मतदारसंघात लावले बॅनर
मुंबईच्या दादर-माहिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या निधीसंदर्भातील वक्तव्याने दादरमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मी आमदार नसताना मला 20 कोटींचा निधी मिळतो आणि त्यातून मी मतदारसंघातील कामं करत असतो असं विधान शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांनी केलं होतं. सरवणकरांच्या याच निधीसंदर्भातील वक्तव्याच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश सावंत आक्रमक झाले आहे. कोणत्या विभागांकडून सरवणकरांना निधी आला आणि मतदारसंघात त्यातून काय कामं झाली. याची खातरजमा करण्याचा चंगच आमदार महेश सावंत यांनी बांधला आहे. तर दुसरीकडे 20 कोटींचा निधी गेला कुठे. त्याचा हिशोब द्या अशा प्रकारचे बॅनरही महेश सावंत यांनी मतदारसंघात लावत सरवणकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
हा सरकारी निधीचा अपव्यय सुरू आहे.. आणि हा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचा अपमान असल्याचं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊतांच्या या टीकेला जोरदार प्रत्यूत्तर दिल आहे. मविआच्या काळात भाजप आमदारांना दमडी मिळाली नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
माजी आमदार सदा सरवणकर यांनी निधीवरून डिवचल्यानंतर आता आमदार महेश सावंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.. त्यांनी थेट बॅनरबाजीसोबतच प्रशासनाशी पत्रव्यवहार करून सरवणकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी काळात दादर-माहिम मतदारसंघात सरवणकर आणि सावंत यांच्यातला हा संघर्ष आणखीण तीव्र होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.