
सत्य समोर आल्यानंतर अनेकांना बसला धक्का…
पुण्यात एका अज्ञात व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मुळशी तालुक्यात फेकणाऱ्या रिक्षाचालकाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने पैशाच्या लालसेपोटी हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आणि पौड पोलिस पुणे ग्रामीण यांनी संयुक्तपणे केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी पौड पोलीस स्टेशन हद्दीतील घोटावडे गावात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, तसेच त्याच्या गळ्यावर आणि डोक्यावर जखमा होत्या. या घटनेनंतर, पोलिसांनी तत्काळ गुन्हा (गु.र.नं. 252/2025) दाखल करून तपास सुरू केला.
घटनास्थळी सापडलेल्या आधार कार्डच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटली. मृत व्यक्तीचे नाव आशुतोष मनोहर वैशंपायन (वय 47, रा. पवई, मुंबई) असे होते. त्यांच्या पत्नी सौ. अक्षदा वैशंपायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष हे 4 सप्टेंबर 2025 रोजी लखनौहून पुण्यात आले होते.
सीसीटीव्ही फुटेज आणि रिक्षाचालकाची ओळख
पुणे पोलिसांनी तांत्रिक तपास करत पुणे रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासात, आशुतोष यांनी पुणे स्टेशनवरून रिक्षा पकडून स्वारगेट गाठल्याचे आणि तेथून दुसऱ्या रिक्षाने सिंहगड रोडकडे गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे रिक्षाचालकाचा शोध घेतला. रिक्षाचालकाचे नाव सचिन प्रकाश जाधव (वय 41, रा. धनकवडी, पुणे) असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी 20 सप्टेंबर 2025 रोजी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पैशांच्या लालसेपोटी खून
चौकशीदरम्यान, आरोपी सचिन जाधवने गुन्हा कबूल केला असून त्याने सांगितले की, आशुतोष वैशंपायन हे स्वारगेटहून त्याच्या रिक्षामध्ये बसले होते आणि ते दारूच्या नशेत होते. त्यांच्या एटीएम कार्डमध्ये लाखो रुपये असल्याचे कळल्यावर पैशांच्या लालसेपोटी आशुतोष यांचा खून केला आणि त्यांचा मृतदेह घोटावडे गावात फेकून दिला.
आरोपीवर कलम 302, 34, 379, 411अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातही त्याच्यावर यापूर्वी 13 जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला 25 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांची कामगिरी
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे अविनाश शिळीमकर, पौड पोलीस स्टेशनचे संतोष गिरीगोसावी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पौड पोलीस करत आहेत.