
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांना एका वर्षात दोनदा पराभवचा धक्का सहन करावा लागला होता. 1996 च्या विधान परिषद निवडणुकीत विलासरावांना अवघ्या अर्ध्या मताने पराभव झाला.
विलासरावांच्या पराभवाच्या चर्चेसोबत शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिलेल्या प्रकाश देवळेंच्या विजयाची देखील मोठी चर्चा झाली होती.
प्रकाश देवळे हे सामान्य कुटंबातील होते. डिफेन्स अकाऊंटमध्ये नोकरी करत होते. मात्र, धाडसाने नोकरी सोडत त्यांनी व्यवसाय सुरू केला. बांधकाम व्यवसायिक म्हणून यशस्वी होत असताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि बाळासाहेब ठाकरेंचे ते कट्टर शिवसैनिक झाले. 1992 ते 1994 च्या दरम्यान त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या कामाची दखल घेत बाळासाहेबांनी त्यांच्यावर पुणे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देखील टाकली.
1995 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि राज्यात प्रथमच युतीचे सरकार स्थापन झाले. विधानसभा निवडणुकीत विलासराव देशमुखांना आपल्या लातुर मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले होते. विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या एका वर्षात विधान परिषदेची निवडणूक होती. 9 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत विलासराव देशमुखांनी विधान परिषदेचे तिकीट काँग्रेसकडे मागितले मात्र, काँग्रेसने त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला.
सत्तेत आलेल्या शिवसेनेने रवींद्र मिर्लेकर आणि प्रकाश देवळे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसकडून छगन भुजबळ, शिवाजीराव देशमुख, रामदास फुटाणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवारी न मिळाल्याने विलासरवा देशमुख हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शिवसेनेकडे त्यांनी पाठींबा मागितला होता. दुसऱ्या पसंतीची मते देण्याचे ठरवते शिवसेनेने त्यांना पाठींबा देखील दिला होता.
शिवसेनेच्या पाठींब्यामुळे प्रकाश देवळे पराभूत होणार अशी चर्चा होती. भाजपमधून गोपीनाथ मुंडे हे विलासराव देशमुख यांच्या विजयासाठी प्रयत्न करत असल्याचेही सांगितले जात होते. त्यामुळे देवळे पराभूत होतील आणि देशमुख विजयी होतील, अशी चर्चा होती. मात्र, शिवसेनेने पाठींबा दिला असला तरी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा देशमुख यांना विरोध असल्याचे सांगितले जात होते.
शेवटच्या फेरीत देशमुख पराभूत
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात 12 उमेदवार होते. या अटीतटीच्या लढतीमध्ये देवळे हे विजयी झाले. तर, शेवटच्या फेरीत अपक्ष उमेदवार विलासराव देशमुख आणि अपक्ष उमेदवार भय्यासिंग उर्फ लालसिंग राठोड यांच्यात काटे की टक्कर होती. मात्र, अवघ्या अर्ध्या मताने देशमुखांचा पराभव झाला आणि राठोड विजयी झाले.
देवळेंनी विजय खेचून आणला
विलासराव देशमुख यांनी विधान परिषदेमध्ये शिवसेनेचा पाठींबा मागितला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. त्यामुळे देशमुख हे शिवसेनेचे उमेदवार असतील अशी हवा तयार झाली होती. मात्र, देशमुखांनी शिवसेनेत येण्यास नकार देत आपल्या रक्ताच काँग्रेस असल्याचे म्हटले होते. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात शिवसेनेकडून देवळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आपलं कौशल्य पणाला लावत योग्य गणितं आखत त्यांनी ही निवडणूक लढली आणि ते विजयी देखील झाले. 1996 ते 2002 हा आमदारकीचा काळ देखील त्यांनी यशस्वीरित्य पूर्ण केला.