
अफगाणिस्तानातील बगराम एअरबेसवरुन तणाव वाढत चालला आहे. कुठल्याही परिस्थितीत अमेरिकेला हा एअरबेस सोपवणार नाही असं तालिबानने स्पष्ट केलय. सूत्रांच्या माहितीनुसार, वॉशिंग्टनने जबरदस्तीने एअरबेस ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तर तालिबान पुन्हा युद्ध सुरु करेल.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे अनेकदा बगराम एअरबेस रणनितीक दृष्टीने अमेरिकेसाठी महत्वाचा असल्याच म्हटलं आहे. तालिबानने सहकार्य केलं नाही, तर वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे
तालिबानचा सुप्रीम लीडर हिबतुल्लाह अखुंदजादाच निवासस्थान ऐनो मीना भागात एका स्थानिक व्यापाऱ्याच्या गेस्टहाऊसमध्ये आहे. तिथे विशेष सुरक्षा ठेवण्यात आली आहे.इंटरनेट सेवा बंद आहे. फोन तसेच अन्य संचार उपकरणं नेण्यावर प्रतिबंध आहे. त्यांच्या आसपास अनेक कमांडो तैनात आहेत असं सूत्रांनी सांगितलं.
अमेरिकेने हल्ला केल्यास जशास तस उत्तर
कंधारमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत तालिबानचे संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब मुजाहिद, परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी, उच्च शिक्षण मंत्री नदा मोहम्मद नदिम, गोपनीय खात्याचे वरिष्ठ अधिकारी, संचार मंत्री, केंद्रीय बँकेचे गवर्नर आणि चीफ जस्टिस अब्दुल हकीम हक्कानी सहभागी झालेले. बगराम एअरबेसच हस्तांतरण शक्य नसल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अमेरिकेने हल्ला केल्यास जशास तस उत्तर द्यायचा निर्णय तालिबानच्या या बैठकीत झाला.
दुसऱ्या देशाच सैन्य मान्य नाही
काही अधिकाऱ्यांनी अखुंदजादाला सांगितलं की, 2020 च्या दोहा करारातंर्गत अमेरिका दहशतवादाविरुद्ध कारवाईसाठी अफगाणिस्तानात परत येऊ शकते. कुठल्याही दुसऱ्या देशाच सैन्य मान्य नाही हे अखुंदजादाने स्पष्ट केलं. राजकीय संवाद सुरु ठेवण्यावर जोर दिला.
भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती न करण्याचा सल्ला
अफगाणिस्तानातील बगराम एअरबेस अमेरिकेचा सर्वात मोठा सैन्य तळ राहिला आहे. 20 वर्ष हा बेस अमेरिकेच्या अभियानाच मुख्य केंद्र होता. ऑगस्ट 2021 मधून अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला, त्यानंतर हा बेस तालिबानच्या ताब्यात आला. डोनाल्ड ट्रम्प चीन आणि दहशतवादाविरुद्ध रणनितीच्या दृष्टीने या बेसला महत्वपूर्ण मानतात. तालिबानने अलीकडे अमेरिकेला 2020 च्या दोहा कराराचा सन्मान करण्याचा आणि भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती न करण्याचा सल्ला दिला.