
महाराष्ट्राला पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे, पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून, नद्यांचं पाणी शेतात घुसल्यानं शेतातील पीकच नाही तर माती देखील वाहून गेली आहे.
शेतकरी हातबल झाले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये तर संपूर्ण गावालाच पुराच्या पाण्याचा वेढा आहे. पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्य वाहून गेलं आहे. पशुधनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. गावाचा संर्पक तुटला आहे.
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन पहाणी करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या धाराशिवच्या दौऱ्यामध्ये तेथील पुरग्रस्तांना मदत केली आहे. त्यांनी दैनंदिन लागणाऱ्या 12 जीवनावश्यक वस्तूंचं एक कीट तयार केलं आहे, अशा 18 टेम्पो कीटचं वाटप एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात केलं आहे.
दरम्यान त्यानंतर आता एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेनं मोठा मदतीचा हात दिला आहे. राज्यात आलेल्या पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व मंत्री तसेच आमदारांचे एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस देणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला आहे. नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना मदत करण्यात कधीही हात आखडता घेणार नाही, असं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर जिल्ह्यातील औंसा तालुक्यात जाऊन नुकसानाची पहाणी केली, यावेळी तेथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. मराठवाड्यात पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. पीक हातातून गेली आहेत. सरकार म्हणून आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की, आम्ही सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत कणार आहोत, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असं, मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील आपल्या सर्व मंत्र्यांचा, आमदारांचा आणि खासदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.