
शेतकऱ्यांसाठी केली मोठी घोषणा; २८७ आमदारांनी घ्यावा आदर्श !
अतिवृष्टीमुळे अर्धा महाराष्ट्रावर ओल्या दुष्काळाचे संकट ओढावले आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वजण शक्य ती मदत करत आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी आदर्शवत निर्णय घेतला आहे. छगन भुजबळ यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपलं एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. छगन भुजबळ यांच्या या निर्णयाचे महाराष्ट्रात कौतुक होत आहे. राज्यातील इतर २८७ आमदारांनी आदर्श घ्यावा, असं पाऊल छगन भुजबळ यांनी उचलले आहे.
जून महिन्यापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांत तर पावसाने कहर केला. अतिवृष्टीमुळे शेतात तलावासारखे पाणी साचलेय. त्यामुळे हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास पाण्यात बुडालाय. शेतकरी राजाच्या आर्त हाकेने काळीज चिरलेय. राज्य सरकार अन् विरोधकांकडून मदत केली जातेय. पण मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व आमदारांना आदर्श घालून दिलाय. भुजबळ यांनी आपलं एक महिन्याचे वेतन शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. भुजबळ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर इतर आमदारांनीही असाच आदर्श घ्यावा, असे म्हटले आहे.
अस्मानी संकट ओढवलेल्या शेतकर्यांना मंत्री छगन भुजबळ यांनी मदतीचा हात दिला आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपले एक महिन्याचे वेतन शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांसाठी जे जे शक्य होईल ते ते सर्व करण्याचे प्रयत्न करणार असल्याचा शब्द छगन भुजबळ यांनी दिला आहे. छगन भुजबळ उद्या (गुरूवारी) नाशिकमधील येवला भागातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करणार आहेत.
छगन भुजबळ यांच्यानंतर आता आणखी कोण कोणता आमदार शेतकऱ्यांसाठी सरसावतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती झाल्यामुळे महाराष्ट्र, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आलाय. शेतामध्ये पिके पाण्यात गेली अन् घरात पाणी गेल्यामुळे अन्न-धान्याची नासाडी झाली. काही ठिकाणी खाण्यासाठी अन्न नाही. पुस्तके पाण्यात गेल्यामुळे मुलांचे भवितव्यही अंधारात गेलेय. शेतकऱ्यांवर चारी बाजूने संकट ओढावलेय. बळीराच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र उभा आहे. राज्यातील प्रत्येकजण बळीराजासाठी उभा राहिलाय.