
मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार तर बुधवारी (ता. 24 सप्टेंबर) सकाळी 6 वाजताच पाहणी दौऱ्यासाठी सोलापुरात पोहोचले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करत याबाबत चर्चा केली. पण ज्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात पोहोचले तेव्हा येथील लोकांनी तत्काळ मदतीची मागणी केली. तेव्हा अजित पवारांनी सगळं सोंग करता येतं, पण पैशांचं सोंग करता येत नाही, असे म्हटले. पण आता त्यांच्या याच विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. 25 सप्टेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या पाहणी दौऱ्यावर सडकून टीका करत म्हटले की, मराठवाड्याच पाहणी दौरा भास आहे. गेले कधी पाहणी केली कधी? शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आक्रोश एकूण घेतला कधी? 36 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 36 लाख शेतकरी उध्वस्त झाले आहेत. मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात काहीच राहील नाही. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांनी काय पाहिले ? काय समजून घेतले ? असे प्रश्न राऊतांकडून उपस्थित करण्यात आले. तर, केवळ पाण्याच्या बॉटलवर फोटो लावून त्याला मदत केली असे म्हणता येत नाही. मदत ही गुप्त असली पाहिजे. मदतीचे आम्ही स्वागत करतो, कारण त्याची गरज आहे. पण, महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने काय केलं? कोणत पथक पाठवले? हे मुर्दाड शासन आहे, असे म्हणत राऊतांनी सरकारला घेरले.
तसेच, यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पैशांबाबत केलेल्या विधानाची सुद्धा विचारणा करण्यात आली. त्याबाबत ते म्हणाले की, पैशांचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका, असा सल्ला देत राऊतांनी अजित पवारांना सुनावले आहे. महाराष्ट्रावर ही वेळ कोणी आणली? ज्या लाडक्या बहिणींना हे मदत करत आहेत, त्यांचे संसार वाहून गेले आहेत. पण आज असं बोलण्याची वेळ का आली आहे तर? यांनी केलेल्या दरोडेखोरीमुळे ही वेळ आली आहे. साधारण 10 लाख कोटींचे कर्ज या सरकारवर आहे. यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही. 65 हजार कोटी व्याज भरतात ही लोक. मराठवाड्याच्या जनतेवर आलेल्या संकटावर कसा मार्ग काढणार? केंद्र सरकार दमडी द्यायला तयार नाही, त्यामुळे ही लोक काय करणार? शेतकऱ्यांनी जगायचं कसं? असे सवालही यावेळी राऊतांकडून उपस्थित करण्यात आले आहेत.