
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. एकीकडे शांततेसाठी चर्चा चालू असताना दुसरीकडे हे दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले करतच आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील या दोन्ही देशांतील युद्ध थांबवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना यात अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या काही विधांनामुळे अमेरिका आपली ताकद युक्रेनच्या बाजूने लावण्याची शक्यता वाढली आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी केलेल्या भाष्यामुळे आता रशियाच्या ताब्यात असलेला युक्रेनचा काही भूभाग परत युकेनलाच मिळणार का? असेही विचारले जात आहे.
नाटो देश आणि युरोपाच्या मदतीने…
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. रशियाने युक्रेनचा बळकावलेला प्रत्येक भूभाग परत मिळवला जाऊ शकतो, असे ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर म्हटले आहे. नाटो देश आणि युरोपाच्या मदतीने युक्रेनला आपली प्रत्येक इंच जमीन रशियाकडून परत मिळवता येईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले. युक्रेनचे प्रमुख वोलोडिमीर झेलेन्स्की यांची भेट झाल्यानंतर ट्रम्प यांनी ही नवी भूमिका घेतली आहे.
एक-एक इंच जमीन परत मिळवू शकतो
अमेरिकेने रशियाला टोकाचा विरोध करावा, अशी भूमिका युक्रेनची राहिलेली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी सध्या केलेल्या विधानानुसार भविष्यात घडामोडी घडल्या तर हा वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्या कुटनीतिचा विजया मानला जाऊ शकतो. याआधी एकदा रशियाच्या ताब्यात एखादा प्रदेश गेला की तो परत कधीच मिळवता येत नाही, असे ट्रम्प म्हणायचे. आता मात्र ट्रम्प यांनी नाटो आणि युरोपच्या मदतीने युक्रेन आपली एक-एक इंच जमीन परत मिळवू शकतो, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. आगामी काळात रशियावर कठोर निर्बंध लादले जाऊ शकतात, असेही संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. युरोपीय देशांनीही यात साथ द्यावी असे आवाहन ट्रम्प यांनी केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रसियाला थेट पेपर टायगर म्हणून डिवचले आहे. त्यामुळे भविष्यात अमेरिका युक्रेनच्या बाजूने आपली ताकद लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
झेलेन्स्की भारताबाबत नेमकं काय म्हणाले?
दरम्यान दुसरीकडे वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी भारताच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. वॉशिंग्टनमध्ये फॉक्स न्यूजवर बोलताना त्यांनी भारत आमच्यासोबतच आहे, असा दावा केला. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर भारत रशियासोबतच्या व्यापारावर पुनर्विचार करेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता ट्रम्प यांनी युक्रेनच्या बाजूने ताकद पुरवण्याची घेतलेली भूमिका तसेच ट्रम्प यांनी युरोप आणि नाटो देशांना केलेले आवाहन, यामुळे भविष्यात नेमक्या काय घडामोडी घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.