
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं रोखठोक उत्तर !
राज्यात पावसाचा कहर चालू असून अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर आला असून, ओढे-नाले तुडूंब भरून वाहत आहेत.
कित्येक गावं पाण्याखाली गेली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सोलापूरसह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे लोकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. अशा स्थितीत लोकांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. दरम्यान, काही भागात शिवसेनेकडून (शिंदे) नागरिकांना मदत केली जात आहे.
पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे फोटो छापण्यात आले आहेत. सरकारी मदतीऐवजी एकनाथ शिंदे व प्रताप सरनाईक वैयक्तिक मदतीवर भर देत स्वतःची जाहिरातबाजी करण्यात व्यस्त आहेत अशी टीका विरोधक करू लागले आहेत. तसेच काही ठिकाणी मदतीचे किट घेऊन येणारी वाहनं नागरिकांनी परत नेण्यास सांगितली. नागरिकांनी या जाहिरातबाजीचा कडाडून विरोध केला. शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावरून शिंदे व सरनाईकांना टोला लगावला आहे.
दरम्यान, विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “तुम्ही मदतीच्या किटवरील फोटो पाहू नका मदत म्हणून काय दिलं आहे ते पाहा.
मदत महत्त्वाची, यात राजकारण आणू नये : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले, “अशा काळात राजकारण करणं दुर्दैवी आहे. लोकांना मदत होणं गरजेचं आहे. अनेकजण अंगावरच्या कपड्यांवर घराबाहेर पडलेत, उघड्यावर आले आहेत. त्या आपल्या बांधवांना आणि भगिनींना मदत करणं, कपडे देणं, जीवनावश्यक वस्तू पुरवणं, धान्य व भांडी पुरवणं हे आपलं कर्तव्य आहे. ती मदत करताना त्यात राजकारण आणता कामा नये. त्यामुळे सर्वांनी या पूरग्रस्तांना करता येईल तेवढी मदत करावी. कारण आपल्यासमोर अस्मानी संकट उभं ठाकलं आहे. सर्वांनी मिळून राजकारण बाजूला ठेवून लोकांच्या मदतीला धाऊन जाऊया.
बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा
आमच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना मदतीचं वाटप केलं. त्या बॅगमध्ये मदत काय आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बॅगवरील फोटोकडे कसलं लक्ष देता? असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला. तर, आमदार तानाजी सावंत म्हणाले, “आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी कधी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन एक किलो धान्य तरी दिलं आहे का?