
राज ठाकरेंच्या सरकारकडे ५ मागण्या !
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने कठोर पाऊले उचलण्याची मागणी केली आहे.
या पत्रातून त्यांनी पत्रात विविध सूचना केल्या असून, एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची महत्त्वाची मागणी केली आहे.
राज ठाकरे यांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे:
‘जाहिरातबाजी सोडा, थेट मदत करा!’
राज ठाकरेंनी आपल्या पत्रात सरकारला थेट ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली आहे. एकरी ७-८ हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे, असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “एकेकाळी बांधावर जाऊन अश्रू पुसणं ही महाराष्ट्राची संस्कृती होती. पण आता फक्त जाहिरातबाजी होतेय. ही जाहिरातबाजी थांबवा आणि शेतकऱ्याला एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई द्या,” अशा कडक शब्दांत त्यांनी सरकारला खडसावलं आहे.
केंद्राकडे मदत मागा
राज्यासमोर आर्थिक आव्हान असलं तरी सरकारने हात आखडता घेऊ नये. गरज पडल्यास केंद्र सरकारकडे मदत मागावी. बिहारला अशाप्रकारे मदत मिळाली असल्याचं सांगत, महाराष्ट्रालाही मदत मिळायला हवी, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
बँकांचा तगादा आम्ही थांबवू
संकटाच्या काळात कर्ज आणि हप्त्यांसाठी बँका शेतकऱ्यांना त्रास देऊ शकतात, अशी भीती व्यक्त करत राज ठाकरे यांनी सरकारला तातडीने बँकांना समज देण्याची सूचना केली आहे. ”तुम्ही जर बँकांना योग्य ती समज दिली नाही, तर आमचे ‘महाराष्ट्र सैनिक’ ती देतीलच,” असा थेट इशारा देत त्यांनी सरकार आणि बँकांना दोन्ही बाजूंनी घेरलं आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काळजी घ्या
याव्यतिरिक्त, अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम, वाढणारी रोगराई आणि आरोग्य सुविधा यांसारख्या गंभीर प्रश्नांकडेही राज ठाकरेंनी सरकारचं लक्ष वेधलं आहे. याबाबत त्यांनी म्हटलं की, ‘अतिवृष्टीमुळे अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारने एकाही विद्यार्थ्याचं शिक्षण थांबणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांना वह्या-पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, तसेच परीक्षांच्या परिस्थितीत त्यांच्या मानसिकतेचा विचार करावा, असेही राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.
रोगराईचा धोका टाळा
अतिवृष्टीनंतर साथीचे रोग वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने सतर्क राहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत सर्व ठिकाणी औषधांचा साठा पुरेसा आहे याची खात्री करावी, अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.