
करोना काळापासून जमा-खर्चाचे गणित बिघडल्यामुळे तसेच दायित्वाचा भार वाढल्यामुळे आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या ठाणे महापालिकेला राज्य शासनाकडून विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
रंगरंगोटी, रस्ते, शौचालये, नाट्यगृह दुरुस्ती, रुग्णालय, आरोग्य केंद्र अशा विविध कामांसाठी कोट्यावधीचा निधी पालिकेला उपलब्ध झालेला असतानाच, त्यापाठोपाठ आता आणखी १६५ कोटी रुपयांचा निधी ठाणे महापालिकेला देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे.
ठाणे महापालिकेचे करोना काळापासून जमा-खर्चाचे गणित बिघडले आणि त्यातच दायित्वाचा भारही पालिकेवर वाढला. करोना काळानंतरही पालिकेची उत्पन्न वसुली सुरू झाली. परंतु दायित्वाचा भार कमी करण्यावर ही रक्कम खर्च होत होती. यामुळे तिजोरी रिकामी झाल्याने पालिकेला विविध नागरी कामांसाठी निधी उपलब्ध नव्हता. दरम्यान, त्याच काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून पालिकेला विविध कामांसाठी निधी देण्यास सुरूवात केली.
राज्य सरकारने महापालिकेला ९१४ कोटी रुपयांचे भरीव विकास अनुदान दिले होते. रस्ते काँक्रीटीकरणासाठी ६०५ कोटी, रंगरंगोटी, गडकरी रंगायतनचे नुतनीकरण, कळवा रुग्णालयाचे नुतनीकरण, दिवा परिसरात रुग्णालय उभारण्याकरीता आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी ५८ कोटी रुपयांचा निधी, आरोग्य केंद्रासाठी निधी तसेच इतर नागरि कामांसाठी राज्य शासनाने पालिकेले आतापर्यंत निधी दिला आहे. यामुळे आर्थिक संकटात असलेल्या पालिकेला शहरातील नागरी कामे करणे शक्य झाल्याचे चित्र आहे.
राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होत असला तरी, पालिकेच्या तिजोरीत इतर कामांसाठी पुरेसा निधीच उपलब्ध नव्हता. ठेकेदारांची देयके थकली होती. यामुळे पालिकेने केंद्र सरकारकडे पायाभुत विकास सुविधांच्या प्रोत्साहनपर अनुदान, कर्ज योजनेतून ९८ कोटींचे बिनव्याजी कर्ज घेतले होते. पालिकेची आर्थिक परिस्थितीत अद्यापही फारशी सुधारणा झालेली नाही.
दरम्यान, पालिकेने काही नागरी विकास कामांसाठी निधी देण्याची मागणीचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले होते. त्यास राज्य शासनाने मान्यता देत १६५ कोटींचा निधी मंजुर केला आहे.
कोणत्या कामांसाठी निधी
डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह नुतनीकरण करण्यासाठी ५ कोटी, ठाणे महापालिका शाळेच्या इमारतींचे मजबुतीकरण आणि नुतनीकरण करण्यासाठी २५ कोटी, ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांचे नुतनीकरण करण्यासाठी ३५ कोटी, ठाणे पशुपालन गृह उभारणीसाठी १ कोटी, कळवा येथील भुमीपुत्र मैदानावर क्रिडासंकुल उभारणीसाठी ५० कोटी आणि कळवा नाट्यगृह उभारणीसाठी ४० कोटी असा एकूण १६५ कोटींचा निधी राज्य शासनाने ठाणे महापालिकेला दिला असून तसा अध्यादेश राज्य शासनाने काढला आहे.