
शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेल्या उद्धव ठाकरेंनी केली एकच विनंती !
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. आता सध्या अनेक सत्ताधारी हे या नुकसानीची पाहणी करत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्यासोबत संवाद साधला. “माझ्या हातात काही नसले तरी, तुम्हाला साथ देण्यासाठी आलो आहे. कोणीही खचू नका आणि वेडवाकडं पाऊल उचलू नका,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात पावसाने हैदोस घातला आहे. गेल्या चार दिवसांपासून धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. तसेच शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेलाय. त्यामुळे ठाकरे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. उद्धव ठाकरे हे मराठवाड्यात दाखल होताच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे व्यथा माडंल्या. मराठवाड्यात पहिल्यांदा उलट झालंय. पाणीच पाणी झालंय. यातून आपल्याला बाहेर पडायला हवं. तुमची मागणी जी आहे कर्जमाफीची ती आहेच. मला त्यात पडायचं नाही. नाहीतर पुन्हा लोक म्हणतील मी राजकारण करतो. आता हे संकट उलट आलं आहे. इतक्या वर्षात असं काही झालेलं मला तरी आठवत नाही. सरकारने जाहीर केलेली मदत २०२३ च्या निकषांनुसार असून, ती शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तुमची मागणी निश्चितच पूर्ण करून घेऊ
यावेळी एका शेतकऱ्याने आम्हाला फक्त साधारण ८००० रुपये मदत मिळेल,” असे सांगितल्यावर, आणखी एका शेतकऱ्याने काढणीसाठीच ६००० रुपये खर्च येत असल्याचे सांगितले. यावर उद्धव ठाकरेंनी म्हणजे जी मदत येणार ती अशीच जाणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. एका शेतकऱ्याने आपले दोन-तीन लाखांचे कर्ज, २० लोकांचे कुटुंब आणि सरकारी नोकरी नसताना मराठा आरक्षणही मिळत नसल्याची व्यथा मांडली. यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना धीर दिला. “तुमचा हात हातात धरणं, एवढंच सध्या आम्ही करू शकतो. पण आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीने सोबत आहोत. तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवून हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची तुमची मागणी निश्चितच पूर्ण करून घेऊ,” असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी भगवान अंकुश म्हस्के या शेतकऱ्याने “जेवायला परवडत नाही, एकरी ५० हजार देऊनही परवडत नाही,” अशी व्यथा मांडून आपले दुःख व्यक्त केले. त्यावर, उद्धव ठाकरे यांनी हात जोडून शेतकऱ्याला खचून न जाण्याची विनंती केली.