
शहरात 8 डबल डेकर बसची चाचणी; कोणत्या मार्गावर धावणार…
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडल लिमिटेडच्या ताभ्यात आता डबल डेकर बस देखील समाविष्ट होणार आहे. तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी आणि बस मार्गांचे सुसूत्रीकरणासह नवीन बसची खरेदी याविषयांवर नुकतीच संचालक मंडळाची बैठक पाप पडली.
या बैठकीत ‘पीएमपी’चं उत्पन्न वाढविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील सल्लागार नेमण्याबाबत चर्चा झाली,’ अशी माहिती पीएमपीचे संचालक आणि मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.
पुण्यात धावणार डबल डेकर
पुण्यातील डबल डेकर बस काही नवीन गोष्ट नाही, पण आधुनिक स्वरूपात या बस परत येणार आहेत. या बस कोणत्या मार्गांवर धावतील हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. त्याधी या बसची ट्रायल रन घेण्यात आली आहे. ज्या मार्गांवर झाडांच्या फांद्या किंवा लटकणाऱ्या तारांसारखे अडथळे नाहीत असेच मार्ग या बससाठी निवडले जातील. प्रायोगिक तत्वावर चार वेगवेगळ्या मार्गांवर या आठ बसची चाचणी घेण्यात येईल. यानंतर त्या प्रवाशांसाठी उपलब्ध केल्या जातील.
PMPML ला सक्षम बनवण्याचे प्रयत्न
पीएमपीएमएल ही सध्या तोट्यात चाललेली कंपनी आहे. या कंपनीला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीच्या ताफ्यात नव्याने एक हजार सीएनजी बस खरेदी करण्याबाबत चर्चा झाली. यासाठी टाटा आणि अशोक लेलँड या कंपन्यांच्या बस घेण्यावरही चर्चा झाल्याची माहिती पुणे महापालिका आयुक्त आणि पीएमपीचे संचालक नवलकिशोर राम यांनी दिली.
सल्लागाराची नेमणूक करणार
पीएमपीच्या काही मार्गांवर उत्पन्न कमी असूनही बस चालवल्या जातात. अशा मार्गांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी एका राष्ट्रीय पातळीवरील सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. सुरुवातीला महापालिकांच्या हद्दीतील मार्गांवर लक्ष केंद्रित केले जाईल आणि त्यानंतर ग्रामीण भागातील मार्गांवर विचार केला जाणार आहे. तसेच पीएमपीच्या मालकीच्या दहा डेपोसह अनेक जागा रिकाम्या आहेत. या जागांचा व्यावसायिकदृष्ट्या विकास करून कंपनीचे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.