
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत घडलेली एक घट लक्षवेधी ठरली आहे. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ भूमिका घेणाऱ्या नेत्यांचे माईक अचानक बंद पडले. एक, दोन नव्हे, तर चार नेत्यांना याच समस्येचा सामना करावा लागला.
त्यामुळे भारताचा मित्र देश असलेल्या इस्रायलची चर्चा संयुक्त राष्ट्रासह जगभरात सुरु झाली. पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा रक्तरंजीत संघर्ष जगाला माहीत आहे. त्यामुळे पॅलेस्टाईनच्या बाजूनं भूमिका घेणाऱ्या नेत्यांचे माईक बंद झाले की बंद करण्यात आले, अशी शंका घेतली जाऊ लागली आहे. यामागे इस्रायलची जगविख्यात मोसाद संघटना असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मोसाद इस्रायलची गुप्तचर संस्था आहे.
इंडोनेशियाचे राष्ट्रपती गाझामध्ये शांती सैन्य तैनात करण्याची भूमिका मांडत असताना त्यांचा माईक बंद झाला. असाच प्रकार तुर्किएचे अध्यक्ष रेचेप तैयप एर्दोगन यांच्यासोबत घडला. हमासला दहशतवादी संघटना न मानण्याची आणि पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्याची भूमिका एर्दोगन यांनी मांडली. तेव्हा त्यांच्या माईकमधून आवाजच बाहेर पडत नव्हता. यांचा आवाज गेलाय, असं त्यावेळी भाषांतरकर्त्याला सांगावं लागलं.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पॅलेस्टाईन आणि द्विराष्ट्रीय सिद्धांतावर बोलण्यास सुरुवात केल्यावर आधी त्यांचा माईक व्यवस्थित होता. पण ज्यावेळी त्यांनी पॅलेस्टाईला मान्यता देण्याचा विषय मांडला, तेव्हा त्यांचा माईक बंद झाला. त्यानंतर काही मिनिटं सभागृहात शांतता पसरली. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांच्यासोबत असाच प्रकार घडला. त्यांनीही पॅलेस्टाईनचा विषय काढताच त्यांचा माईक बंद पडला.
नेता कोणत्याही देशाचा असो, त्यानं पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्याची भाषा करताच त्यांचे माईक कसे बंद झाले? ही केवळ तांत्रिक चूक आणि योगायोग होता की यामागे एखाद्या गुप्तचर यंत्रणेचा हात होता? अशी चर्चा जागतिक पातळीवर सुरु झाली आहे. हा केवळ योगायोग असू शकत नाही, असं अनेक नेत्यांना वाटतं. पॅलेस्टाईनला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळत असलेलं वाढतं समर्थन इस्रायलला पटण्यासारखं नाही. त्यामुळेच संशयाची सुई इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादकडे वळली आहे.