
उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना धीर !
राज्यातील अनेक भागांना मुसळधार पावसाने तडाखा दिला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी धाराशीव जिल्ह्यातील इटकूर येथे शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.
या वेळी ठाकरे म्हणाले, “तुम्ही खचून जाऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत.”
शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी सरकारी मदतीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, मदत देताना वेडेवाकडे निकष लावले जात आहेत. काही सरकारी अधिकारी मोठेपणाने वागत असल्यास त्यांना सरळ करण्याची हिंमत दाखवावी लागेल. शेतकऱ्यांच्या हक्काचे जे काही आहे, ते त्यांना मिळवून दिलेच पाहिजे, असे ते म्हणाले.
बँकांकडून आलेल्या वसुली नोटिसांबाबत ठाकरे यांनी तीव्र भूमिका घेतली. त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, ज्या बँकांकडून नोटिसा आल्या आहेत त्या सर्व नोटिसा एकत्र करून आमच्याकडे पाठवा. आम्ही त्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवून सांगेन – “बाबा, या नोटिसा तुम्हीच भरा.” त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर बँकांच्या नोटिसा थांबल्या नाहीत तर त्यांची होळी करावी लागेल.
या दौऱ्यात ठाकरे यांच्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार कैलास पाटील उपस्थित होते. पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी या संकटाच्या काळात एकटे वाटून घेऊ नये, त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे आहोत, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले.
मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल झाले आहेत. पीक वाचवायचे कसे, नुकसान भरून काढायचे कसे या चिंतेने ते ग्रासलेले आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी दिलेला भावनिक आधार आणि बँकांच्या नोटिसांविरोधातील कठोर इशारा, शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरत आहे.