
संजय राऊतांनी साधला महायुतीच्या नेत्यावर निशाणा !
मुंबई : राज्यामध्ये आस्मानी संकट आलेले असताना नेते शेतकऱ्याच्या बांध्यावर जाऊन भेटी देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शेतकऱ्यांच्या भेटीला गेले असून पूरस्थितीची पाहणी करत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी गेले होते. उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला असून त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत मदत पोहचली नसून पंचनामे देखील होत नसल्याची बाब समोर आली असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीवर भाष्य केले असून सत्ताधारी नेत्यांना धारेवर धरले. खासदार राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी काल मराठवाडा दौरा केला. शेतकऱ्यांना मदत पोहचलेली नाही, पंचनाम्यासाठी अधिकारी पोहचलले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणि फोटो लावणाऱ्या उपमुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून जाऊ नका. शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की कर्जमाफी हवीये. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रमुख दोन मागण्या केल्या की हेक्टरी ५० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्या आणि दुसरी म्हणजे सरसकट कर्जमाफी द्या, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
खासदार संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन अरेरावी करणाऱ्या नेत्यांचा देखील खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टोलवाटोलवी करतायत. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की पैशाचं सोंग आणता येणार नाही. पीएम केअर फंड आहे, त्याच्या मधील रक्कम भारताच्या बजेटपेक्षा जास्त असेल असं लोकांना वाटतं. उद्धव ठाकरे यांची मागणी आहे की पीएम केअर फंडाचा वापर करून महाराष्ट्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. गाव पाण्यात आणि तानाजी पुण्यात अशी घोषणा काल शेतकऱ्यांनी दिली. तानाजी सावंत हे मतदारसंघात नाहीत, पुण्यात आहेत. एक दिवस फक्त ते मतदारसंघामध्ये आले, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे.
खासदार राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे पेशवे काळातील शहाणे आहेत, नाना फडणवीस यांची भाषा जशी होती तशी भाषा ते बोलतायत. ओला दुष्काळ हा शब्द शासकीय नाही असं ते म्हणतायत. पण ओला दुष्काळ जाहीर करा ही लोकांची मागणी आहे. अजित पवार जे बोलतात ती त्यांची स्टाइल नाही तर मगरुरी आहे. तुम्ही गोट्या खेळण्याच्या लायकीचे आहेत, तुम्ही भ्रष्ट आहात. या तिघांनी काय केलं? मुख्यमंत्री म्हणतात राजकारण करू नका. तुमच्या सडक्या डोक्यात फक्त राजकारण विचार येतात, यात कसलं आलं राजकारण. ठाण्याचे डीसीएम तर फोटो लावून मदत देतायत. मुख्यमंत्री यांना निवेदन द्यावं लागत, ही हस्यास्पद गोष्ट आहे. अमित शाह त्यांच्या मुलाला सांगा क्रिकेट बॉर्डकडून २-५ हजार कोटी मदत द्या म्हणावं. मुख्यमंत्री यांनी दिल्लीत दोन्ही उपमुख्यमंत्री यांना बोलवावं पंतप्रधान, अर्थमंत्री कृषिमंत्री सहकार मंत्री यांची भेट घ्यावी आणि मदत घ्यावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.