
एका रात्रीत नावही बदललं; जाणून घ्या कुणी खरेदी केला…
मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय शॉपिंग डेस्टिनेशनपैकी एक मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील विवियाना मॉलचे नाव अचानक बदलल्याची जोरदार चर्चा ठाणेकरांमध्ये तसेच इतर शहरातील नागरिकांमध्ये सुरु आहे.
यासंदर्भातील अनेक रील देखील इन्स्टाग्राम वर गेल्या काही दिवसांपासून वायरल होत आहेत. परंतू, नाव बदलण्यामागील कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या मॉलची कोटींच्या व्यवहारात विक्री झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाण्यात २०१३ साली सुरू झालेल्या विवियाना मॉलचा विकास अश्विन शेट ग्रुप यांनी केला होता, तर नंतर त्यात सिंगापूरच्या सार्वभौम निधी GIC यांचीही भागीदारी झाली. सुमारे १० लाख चौरस फूट व्यापणाऱ्या या मॉलमध्ये २५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची दुकाने, मोठा फूड कोर्ट, अत्याधुनिक मल्टीप्लेक्स, तसेच एंटरटेनमेंट झोन्स आहेत. टाटा स्टारबझारचे हायपरमार्केट आणि अनेक प्रीमियम फॅशन ब्रँड्समुळे हा मॉल ठाणे, मुलुंड, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या भागांतील ग्राहकांसाठी प्रमुख शॉपिंग हब ठरला. शॉपिंगसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने आणि सामाजिक उपक्रमांमुळे विवियाना मॉलने स्थानिक समाजाशी घट्ट नाते जोडले. शॉपिंगच नाही तर, अनेक कुटूंब किंवा मित्र परिवार या मॉल मध्ये फिरण्यासाठी देखील येत.
परंतू, गेले १२ वर्षांपासून ‘विवियाना’ या नावाने नावारुपाला आलेल्या या मॉलचे अचानक नाव बदलेल असा विचारही कोणी केला नव्हता. पण, खरंच आता ‘विवियाना’ मॉल ‘लेक शोर’ या नावाने ओळखला जाणार आहे.अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीच्या पाठबळावर लेक शोर इंडिया ॲडव्हायजरीने हा मॉल १,९०० कोटी रुपयांना विकत घेतला आहे. हा व्यवहार भारतामधील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार ठरला आहे. या बदलामुळे ठाण्याच्या रिटेल क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार असून खरेदीदारांसाठी अधिक आधुनिक आणि आकर्षक अनुभव उपलब्ध होणार आहे. लेक शोरकडे या मॉलची मालकी गेल्याने मॉलची स्थिती सुधारेल, नवीन गुंतवणूक, नाविन्यपूर्ण धोरणे आणि सुधारित ग्राहक अनुभव देता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ठाणे ठरणार नवे रिटेल पॉवरहाऊस
१,९०० कोटी रुपयांच्या या अधिग्रहणामुळे भारताच्या रिअल इस्टेट आणि रिटेल क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. उद्योगतज्ज्ञांच्या मते, या व्यवहारातून भारताच्या रिटेल वाढीवर आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) ठाण्याच्या धोरणात्मक महत्त्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. तलावांचे शहर म्हणून ओळखले जाणारे ठाणे आता वेगाने कॉर्पोरेट, निवासी आणि रिटेल पॉवरहाऊसमध्ये विकसित होत आहे. उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, प्रीमियम गृहनिर्माण प्रकल्प आणि वाढती शहरी लोकसंख्या यामुळे लेक शोरसारख्या मोठ्या रिटेल डेस्टिनेशनसाठी ठाणे एक आकर्षक केंद्र ठरत आहे.