
महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. मे महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्थ केले आहे.
शेतकरी संकटात असताना भाजपा युतीचे सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण मदतीची घोषणा केली नाही. आता मुख्यमंत्री दिल्लीत गेले पण तिथे त्यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सुरजागड लोखंड खाणीसंदर्भात चर्चा केली हे अत्यंत त संतापजनक असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून भरीव पॅकेज घेऊनच परत यावे, अन्यथा तेथेच थांबावे, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील कामखेड, गुळभेली, राहेरा दाभोळ तांडा नळकुंड, व बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट, पाडळी या गावांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये तसेच जमीन खरवडून गेली त्यासाठी एकरी २ लाख रुपये द्यावेत, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावेत यासह शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागण्या काँग्रेस पक्षाने केल्या आहेत. पण सरकारने जी मदत जाहीर केली आहे, ती अत्यंत तुटपुंजी असून हेक्टरी ३ हजार रुपयेही पदरात पडणार नाहीत. काँग्रेस पक्षाने याआधी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. आता पुन्हा ३ ऑक्टोबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
…मग आताच्या सरकारलाच काय अडचण आहे?
काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना नेहमीच मदत दिली मग आताच्या सरकारलाच काय अडचण आहे? असा प्रश्न विचारून पैशाचे सोंग आणता येत नाही. या अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाचा समाचार घेत, अजित पवार यांना लाज वाटली पाहिजे, अदानीच्या फाईलवर सही करताना, ८८ हजार कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देताना त्यांना हे सुचत नाही का? असा सवाल सपकाळ यांनी केला.
दरम्यान, कल्याणमधील ७२ वर्षांच्या दलित काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपाच्या गुंडांनी जातीवाचक शिवीगाळ करून अशोभनीय कृत्य केले आहे. हे गुंड भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या गावातीलच आहेत यावरून भाजपाची संस्कृती काय आहे हे स्पष्ट होते. या गुंडांवर कठोर कारवाई केली पाहिजे ही काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेस पक्ष पगारे या कार्यकर्त्याच्या पाठीशी असून त्यांचा लवकरच मोठा गौरवही केला जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिली आहे.