
झाला मोठा गेम; पाक सुरक्षा दलाची उडाली झोप…
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि आसपासच्या आदिवासी भागांमध्ये ड्रोन तसेच क्वाडकॉप्टरच्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या ड्रोन हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा दलाची झोप उडाली आहे.
पाकिस्तानवर मोठं संकट निर्माण झालं असून, या ड्रोन हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार इत्तेहाद-ए- मुजाहिद्दीन आणि हाफिज गुल बहादूर सारख्या दहशतवाद्यांच्या गटांनी आता या तंत्रज्ञानाचा उघडपणे वापर सुरू केला आहे.
त्यानंतर आता पाकिस्तानचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या टीटीपी गटानं देखील या नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्यानं पाकिस्तानात खळबळ उडाली आहे, टीटीपीकडून होणारे हल्ले कसे परतून लावायचे असा प्रश्न आता तेथील सरकारला पडला आहे, सोबतच हे तंत्रज्ञान टीटीपी आणि दहशतवाद्यांच्या इतर गटापर्यंत कसं पोहोचलं असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार 19 मे रोजी उत्तर वजिरिस्तानच्या होर्मुज गावामध्ये झालेल्या एका ड्रोन हल्ल्यामध्ये तीन लहान मुलं आणि एका तरुणाचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तानच्याच जवानांनी केल्याचा आरोप येथील स्थानिक लोकांकडून करण्यात आला होता, मात्र त्यानंतर पाकिस्तान सरकारकडून एक निवेदन जारी करण्यात आलं, ज्यामध्ये हा हल्ला पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं नाही तर दहशतवाद्यांच्या गटानं केल्याचं म्हटलं होतं, मात्र तरी देखील स्थानिक नागरिकांना या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारविरोधातील रोष आता आणखी वाढला आहे, अशाच एका हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 10 पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते.
दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार टीटीपीकडून जे ड्रोन हल्ल्यासाठी आता वापरण्यात येत आहेत, ते अमेरिकन बनावटीचे नसून, चीनमध्ये तयार झालेले स्वस्त आणि कमी खर्चात तयार होणारे ड्रोन आहेत, काही मीडिया रिपोर्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, चीनमधूनच हे ड्रोन टीटीपी खरेदी करत आहे. दरम्यान हे ड्रोन हल्ले थांबवण्याचं मोठं आव्हान आता पाकिस्तानी सुरक्षा दलासमोर निर्माण झालं आहे, हे हल्ले कुठेही, कधीही होत असल्यानं पाकिस्तान सरकारची झोप उडाली आहे.