
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेला शेवटचा सुपर ४ सामना अत्यंत रोमांचक झाला. टाय झालेल्या या लढतीचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला आणि त्यात भारतीय संघाने बाजी मारली.
सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकन संघाला केवळ २ धावाच करता आल्या. हे आव्हान भारतीय संघानं सहज पार केलं. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघाची गाठ पाकिस्तानशी पडणार आहे. मात्र काल झालेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सुपर ओव्हरमध्ये वादामुळे वातावरण तापलं होतं. त्यावरून आता श्रीलंकेचे प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी आयसीसीकडे महत्त्वाची मागणी केली आहे.
श्रीलंकेचा फलंदाज दासून शणाका हा सुपर ओव्हरमधील वादाचं केंद्र ठरला. त्याचं झालं असं की, सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेकडून दासून शणाका हा फलंदाजीसाठी आला. अर्शदीपने टाकलेल्या या षटकातील चौथ्या चेंडूवर शणाका फसला आणि भारतीय क्षेत्ररक्षकांनी तो यष्ट्यांमागे झेलबाद झाल्याचं अपील केलं. त्यानंतर पंचांनीही बोट वर करत त्याला बाद ठरवलं. मात्र असं असतानाही शणाका धाव घेण्यासाठी धावला. पण तेव्हा चेंडू न यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हातात होता. तेव्हा सॅमसनने चेंडू यष्ट्यांवर फेकत शणाकाला धावबाद केले.
सुपर ओव्हरमध्ये दुसरी विकेट पडल्याने श्रीलंकेचा डाव संपला, असे सगळ्यांना वाटले. मात्र शणाकाने डीआरएस घेत पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागितली. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी अल्ट्राएजमध्ये तपासून पाहिले असता चेंडू आणि बॅटचा स्पर्श झाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे शणाकाला नाबाद ठरवण्यात आले. त्यानंतर शणाका पुन्हा खेळपट्टीवर परतला. तसेच संजू सॅमसनने त्याला धावबाद केले असले तरी त्याला बाद दिले गेले नाही. त्याचं कारण म्हणजे एमसीसीच्या नियम क्रमांक २०.१.१.३ नुसार एखाद्या फलंदाजाला बाद दिलं जातं तेव्हा चेंडू डेड होतो. संजू सॅमसनने जेव्हा शमाकाला बाद केले त्याच्या आधीच पंचांनी त्याला झेलबाद ठरवलेले असल्याने चेंडू डेड झाला होता. त्यामुळे संजूने त्याला धावचीत केलं तरी ते नियमानुसान मान्य झाले नाही.
आता श्रीलंकेचे प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी सुपर ओव्हरमधील वादानंतर नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, या वादांचं कारण नियमच आहेत. त्यामुळे नियमांमध्ये सुधारणा झाली पाहिजे.
नियमांनुसार पहिला निर्णय मान्य केला जातो. त्यामुळे शणाकाला बाद दिलं गेलं तेव्हा चेंडू डेट झाला होता. त्यामुळे डीआरएसनंतर जेव्हा निर्णय बदलण्यात आला तेव्हा पहिलाच निर्णय मान्य केला गेला. मात्र अशा प्रकारच्या परिस्थितीपासून वाचण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे, असेही जयसूर्या यांनी सांगितले.