
भारताने शाहबाज शरीफ यांच्या दाव्याची उडवली खिल्ली…
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलताना भारताविरोधात गरळ ओकली. भारताविरोधात अनेक वेगवेगळे दावे शरीफ यांनी केले.
मात्र, त्यांच्या दाव्याला भारताच्या राजनैतिक अधिकारी पेटल गहलोत यांनी जोरदार प्रत्युत्तर देत सर्व आरोप खोडून काढले. तसेच शाहबाज शरीफ यांनी केलेल्या वक्तव्याची देखील पेटल गहलोत यांनी खिल्ली उडवली.
भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या संघर्षात पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या विजयाच्या दाव्याची भारताने शनिवारी खिल्ली उडवली. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पेटल गहलोत यांनी शाहबाज शरीफ यांना खडेबोल सुनावले. ‘ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने उद्ध्वस्त केलेली तुमची हवाई तळाची धावपट्टी तुम्हाला विजयासारखी दिसते का?’ असा खोचक सवाल गहलोत यांनी केला. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
पेटल गहलोत या म्हणाल्या की, भारतीय सैन्याने अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर केलेला विध्वंस, त्या नुकसानाचे फोटो अर्थातच सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत. जर उद्ध्वस्त धावपट्टी आणि जळालेले हँगर हे पंतप्रधानांनी दावा केल्याप्रमाणे विजयासारखे दिसत असतील आणि पाकिस्तान त्याचा आनंद घेत असेल तर त्यांचं स्वागत आहे, अशी खोचक शब्दांत गहलोत यांनी टीका केली.
एक चित्र हजार शब्द बोलते आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने दहशतवादी संकुलांमध्ये मारलेल्या दहशतवाद्यांचे अनेक चित्र आम्ही पाहिले. जेव्हा वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी आणि नागरी अधिकारी सार्वजनिकरित्या अशा कुख्यात दहशतवाद्यांचे गौरव करतात आणि त्यांना श्रद्धांजली वाहतात, तेव्हा या राजवटीच्या कृतींबद्दल काही शंका असू शकते का?”, असाही सवाल पेटल गहलोत यांनी केला.
‘कितीही खोटं बोललं तरी सत्य…’, भारताने पाकिस्तानला फटकारलं
संयुक्त राष्ट्रांत भारताच्यावतीने पेटल गेहलोत यांनी उत्तराचा अधिकार वापरून पाकिस्तानला उत्तर दिलं. गेहलोत म्हणाल्या की, आज सकाळी या व्यासपीठावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी एक हास्यास्पद नाटक सादर केलं आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या परराष्ट्र धोरणाचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू असलेल्या दहशतवादाचा गौरव केला. मात्र, कितीही खोटं बोललं तरी सत्य लपवता येत नाही, असं पेटल गहलोत यांनी म्हटलं.
कोण आहेत पेटल गहलोत?
पेटल गहलोत यांचा जन्म दिल्लीतला. मुंबईच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी राजशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेज फॉर वूमन मधून पदव्यूत्तर पदवी घेतली. २०१५ साली त्या भारतीय विदेश सेवेत (IFS) सामील झाल्या. पेटल या संयुक्त राष्ट्रात भारताच्या प्रमुख राजनैतिक अधिकारी म्हणून काम करत आहेत. जुलै २०२३ मध्ये संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनमध्ये त्यांची प्रथम सचिव म्हणून नियुक्ती झाली. संयुक्त राष्ट्र संघटनेत जाण्यापूर्वी पेटल यांनी २०२० ते २०२३ पर्यंत परराष्ट्र मंत्रालयाच्या युरोपियन पश्चिमी विभागात सहसचिव म्हणून काम केले.